कोल्हापूर : नेसरी-गडहिंग्लज रोडवर लाकूडवाडी घाटात शनिवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने चारचाकीच्या हौद्यात लपवून ठेवलेला ४ लाख ६१ हजारांचा मद्यसाठा व संबधित वाहन असे एकूण १० लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा भरारी पथकास गोवा बनावटीचे विदेशी मद्यसाठा घेऊन संशयित सागर ठाकूर (रा. साठेली, सिंधुदुर्ग) व प्रदीप गावडे (कैरी, सिंधुदुर्ग) हे नेसरी गडहिंग्लज मार्गावरून पुढे जाणार असल्याची माहिती मिळाली. या संशयितांकडे असलेले चारचाकी वाहन पथकाने थांबण्याचा इशारा करून थांबले नाही. त्यामुळे पथकाने पाठलाग केला असता संशयितांनी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पलायन केले.या चारचाकीत १८० व ७५० मिलीचे विविध ब्रँडचे ७४ बॉक्स आढळून आले. त्यांची किंमत ४ लाख ६१ हजार व चारचाकी वाहनाची किंमत ६ लाख असा १० लाख ६१ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केली. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक पी.आर.पाटील, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, विजय नाईक, दुय्यम निरीक्षक के.ए.पाटील, कर्मचारी सचिन काळेल, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, जय शिनगारे, आदींनी केली
नेसरी-गडहिंग्लज मार्गावर साडेचार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त, वाहन सोडून संशयित झाले पसार
By सचिन भोसले | Published: November 05, 2022 1:04 PM