राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेशी संलग्न सुमारे ४५ हजार शेतकरी यावर्षी सरकारच्या व्याज सवलतीला मुकले आहेत. जूनअखेर जिल्हा बॅँकेची १४३३ कोटी वसुली झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण कमी आहे. सरकारच्या कर्जमाफीचा परिणाम वसुलीवर झाल्याने बॅँकेपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.जिल्हा बॅँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. बॅँकेच्या धोरणानुसार एकरी पीक कर्ज दिले जाते. त्याचबरोबर पाईपलाईन, शेती अवजारे खरेदीसाठी मध्यम मुदत, तर इतर गरजांसाठी शेतकऱ्यांना ‘खावटी’ कर्जपुरवठा केला जातो. बॅँकेने २०१८-१९ या वर्षात तिन्ही कर्जप्रकारांत दोन लाख ९८ हजार शेतकºयांना १६९२ कोटींचे कर्जवाटप केले आहे. जिल्ह्णात ऊस उत्पादक शेतकरी अधिक असल्याने जून ते जून असे परतफेडीचे वर्ष धरले आहे. या कालावधीत कर्जाची परत करणाºया एक लाखापर्यंतच्या शेतकºयांना संपूर्ण व्याज परतावा मिळतो. एक ते तीन लाखांपर्यंतच्या शेतकºयांकडून केवळ एक टक्का व्याज वसूल केले जाते. तीन लाखांपेक्षा अधिक व मध्यम मुदत, खावटी कर्जाला विकास संस्थांचा प्रचलित व्याजदर आकारला जातो.गेल्या वर्षी जिल्हा बॅँकेने १५७० कोटींचे कर्जवाटप केले होते. त्यांपैकी १३८८ कोटी (८८ टक्के) जूनअखेर वसूल झाले होते. यंदा वाटप केलेल्या १६९२ कोटींपैकी १४३३ कोटी (८४ टक्के) वसूल झाले आहेत. राज्य सरकारची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना (कर्जमाफी) गेली दोन वर्षे सुरू आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने थकीत कर्जाची माहिती विकास संस्थांकडून घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे सूतोवाच मंत्र्यांकडून होत असल्याने शेतकºयांमध्ये कर्ज परतफेडीबाबत संभ्रम आहे.
४५ हजार शेतकरी व्याज सवलतीला मुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:51 AM