या जाचक अडचणीच्या तरतुदींविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरने ‘भारत व्यापार बंद’ आणि ‘देशव्यापी चक्काजाम’ पुकारला होता. त्यामध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजशी संलग्न विविध ३३ संघटनांमधील सभासद सहभागी झाले. राजारामपुरी, शाहुपुरी व्यापारपेठ, लक्ष्मीपुरी धान्य बाजार, गुजरी, शिवाजी रोड आदी परिसरातील दुकाने व्यापारी, व्यावसायिकांनी बंद ठेवली. त्यामुळे या परिसरात शांतता दिसून आली. जीएसटीच्या मर्यादेत नसलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने, व्यवसाय सुरू ठेवल्याने काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बहुतांश दुकाने दुपारी तीननंतर पूर्ववत सुरू झाली. अन्य व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोटारसायकल रॅलीला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसल्याने बंदतील सहभागी व्यापारी, व्यावसायिकांच्या संघटनांचे पदाधिकारी असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई, केंद्रीय जीएसटीचे कोल्हापूर विभागीय आयुक्त विद्याधर थेटे यांना निवेदन दिले. जीएसटी, फूड सेफ्टी ॲक्टमधील जाचक, अडचणीच्या तरतुदींमध्ये केंद्र सरकारने लवकर सुधारणा करून व्यापारी, व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या शिष्टमंडळात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रीय संघटन सचिव ललित गांधी, ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, खजानिस हरिभाई पटेल, माजी अध्यक्ष आनंद माने, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, तौफिक मुल्लाणी, संपत पाटील, संभाजीराव पोवार, विजय नारायणपुरे, महेश सामंत यांचा समावेश होता.
चौकट
मालवाहतूक ट्रकची चाके थांबली
या बंदमध्ये राज्यात आणि अंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे सुमारे १५ हजार चालक-मालक सहभागी झाले. त्यांनी शिरोली जकात नाका, मार्केट यार्ड, शाहू टोल नाका, आयसोलेशन रोड आदी ठिकाणी ट्रक थांबविले. दोनशे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सहभागी झाले. या क्षेत्रातील जिल्ह्यातील सुमारे शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाली, असे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.