लोकमत न्यूज नेटवर्क-- कऱ्हाड : तालुक्यातील ४७ गावांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, इच्छुकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. येत्या निवडणुकांमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे बहुमताबरोबरच सरपंचपदही आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी नेत्यांनी चाचपणीही सुरू केली आहे. थेट सरपंचमुळे अनेक नेत्यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे.कऱ्हाड तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजला जातो. प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष या तालुक्याकडे लागून राहते. इतर निवडणुकांबरोबरच येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही रंगतदार होतात. सध्या आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या कऱ्हाड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, प्रभाग रचना व आरक्षण ३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरपंचपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे. दि. ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, असेही सांगण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर ११ जुलैअखेर हरकती दाखल करण्याकरिता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. तालुक्यातील ४७ ग्रामपंचायती निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामध्ये गणेशवाडी, घराळवाडी, हनुमंतवाडी, हवेलवाडी, येळगाव, अंधारवाडी, हनुमानवाडी, हिंंगनोळे, कळंत्रेवाडी, साबळेवाडी, तळबीड, चरेगाव, आटके, किवळ, अंतवडी, शामगाव, दुशेरे, गोंदी, जुळेवाडी, वडगाव हवेली, धावरवाडी, चोरजवाडी, मस्करवाडी, भांबे, करंजोशी-हरपळवाडी, सावरघर, आरेवाडी, डेळेवाडी, सुपने, पश्चिम सुपने, कोरेगाव, बाबरमाची (पुनर्वसित डिचोली) वनवासमाची (खोडशी) विजयनगर, चिंंचणी, घोलपवाडी, जुने कवठे, कालगाव, पाडळी, हेळगाव, मनू, रेठरे खुर्द, कासारशिरंबे, ओंडोशी, आणे, कुसूर, तारुख, वानरवाडी आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. संबंधित ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतींची सुनावणी दि. १५ जुलै रोजी होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पारण्यासाठी नेटके नियोजन केले आहे. प्रभाग रचनेत येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून अंतिम प्रभाग यादी जाहीर होईल. सरपंचाची अनेकांना स्वप्नेयावर्षी ४७ ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडणूक येणार असल्याने या गावांतील काही मंडळींना आपणच भावी सरपंच म्हणून निवडून येणार असल्याची जणू स्वप्नेच पडू लागल्याची चर्चा अनेक गावांमध्ये सुरू आहे. सर्व सामाजिक कार्यात सहभाग घेणारा, सुख-दु:खात सहभागी होणारा व अडीअडचणींना मदत करणारा, गावचे प्रश्न सोडवणारा असा भावी सरपंच गावात कोण होईल, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.तीन गावांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकसावरघर, बाबरमाची (डिचोली) व करंजोशी (हरपळवाडी) या पुनर्वसित ग्रामपंचायतींची पहिल्यांदा निवडणूक होत आहे. तीन वॉर्ड, सात सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींची लोकसंख्या दीड हजारापेक्षा कमी आहे. यंदा पहिल्यांदाच या ग्रामपंचायती निवडणूक होत आहे. यंदा सरपंच कोणाचा ?‘यंदा सरपंच आमचाच’ या इर्षेला पेटून गावोगावचे नेते, कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत. गावागावांतील राजकारण चांगलेच पेटून उठले आहे. अनेक राजकीय पक्षांतील नेते मंडळींनी सरपंच उमेदवारासाठी मोर्चेबांधणी केली आहे. थेट जनतेतून सरपंचाची निवड होणार असल्याने स्वच्छ व निर्मळ चारित्र्याचा सरपंच कोण याची शोधाशोध सुरू झाली आहे.
४७ गावांत ‘कौन बनेगा सरपंच’
By admin | Published: July 08, 2017 9:49 PM