श्रीकांत ऱ्हायकरधामोड : बुरंबाळी व नऊ नंबर ( ता. राधानगरी ) येथील तुळशी धरणग्रस्थांचा गेल्या सत्तेचाळीस वर्षाचा त्यांच्या राहत्या घराचा सातबाऱ्याचा प्रश्न आज निकाली निघाला. जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन या धरणग्रस्तांना एक दिवसात त्यांच्या जमिनीचे सातबारे करण्याचे आदेश दिले. पण या घटनेला दहा दिवस उलटून गेले तरी संबंधित धरणग्रस्तांना सातबारे उतारे मिळाले नव्हते.
यावरती 'लोकमतने ' बुरंबाळी धरणग्रस्त सातबाराच्या प्रतीक्षेत या मथळ्याखाली काल वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे केले. त्यानंतर काल पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आजच्या आज सातबारे तयार करा असे सुनावले. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यानी ऑफिसमध्ये थांबून हे सातबाऱ्याचे काम पूर्ण केले.लोकमतने या ४६ धरणग्रस्तांची गेल्या ४४ वर्षापासूनची रखडलेली मागणी लावून धरत त्यांना त्यांच्या राहत्या घराचे हक्काचे सातबारे मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला. तुळशी धरण बांधणीपासून हे शेतकरी विस्थापित ठिकाणावर वास्तव्यास आहेत. त्यांचा हा हक्काच्या सातबाराच्या लढा गेली कित्येक वर्ष चौकशीच्या प्रक्रियेत अडकला होता. या फाईलवरती गेल्या कित्येक दिवसांपासून त्रुटी निघत होत्या. दहा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यानी अचानक बुरंबाळी गावाला भेट दिली व या धरणग्रस्तांच्या मागण्या जाणून घेतल्या.तेथूनच सातबारे अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाला देऊन एकच दिवसात सातबारे तयार करण्याची सूचना केली. पण दहा दिवस लोटले तरी सातबारे तयार न झाल्याने लोकमतने यावर प्रकाशझोत टाकत सातबाऱ्यासाठी धरणग्रस्तांची प्रतीक्षा या आशियाचे वृत्त प्रसारित केले व पुन्हा एकदा प्रशासनाने या सातबाराच्या कामात गती घेतली.
संध्याकाळपर्यंत सातबारे अद्यावत करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबूनच हे सातबारे पूर्ण केले. रात्री उशिरा ही बातमी बोंबाळे ग्रामस्थांना समजताच त्यांनी आपला इतक्या वर्षाचा प्रश्न निकाली निघाल्याच्या आनंदात फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.
गेल्या चव्वेचाळीस वर्षांपासून आम्ही हक्काच्या घरासाठी जो संघर्ष करत होतो, त्याला आज पूर्णविराम मिळाला. प्रशासनामुळेच आम्हाला हक्काचे सातबारे मिळाले याचा खूप मोठा आनंद आहे .- के .डी. इंगवले, अध्यक्ष, ज्योतिर्लिंग तुळशी धरणग्रस्त संघटना