एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : परिस्थितीचा गैरफायदा, प्रेमाचे जाळे आणि लग्नाचे आमिष दाखवून गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे ३६९, तर विनयभंगाचे ७९८ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. त्यामध्ये लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) कलम २०१२ चे ३ (ए), ५ (एफ), ६ ते १२ (एल) प्रमाणे १२, तर बलात्कार (३७६) ८ अशा २० गुन्ह्यांतील आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.राजेंद्रनगर येथील एका शाळेत हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाऱ्या चार मुलींवर अत्याचार करणारा नराधम क्रीडाशिक्षक संशयित विजय विठ्ठल मनुगडे (रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्याचार व विनयभंग गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती पुढे आली आहे.वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना जास्त आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३० आॅगस्ट २०१९ अखेर ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या ५० अल्पवयीन मुला-मुलींवर खाऊचे आमिष, लग्नाची फूस, घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अतिप्रसंग करण्याच्या आणि अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. ही गुन्हेगारांची विकृती रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे, तर प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलांवरील अत्याचाराचे ३१९ गुन्हे दाखल आहेत. विनयभंग (३५४ अ ५०६) नुसार ७९८ गुन्हे दाखल आहेत.पूर्वी अत्याचार, विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी मुली, तरुणी, महिला अब्रुपोटी न्यायालयात जबाब देण्यास टाळाटाळ करायच्या, त्याचा फायदा आरोपींना होत असे; त्यामुळे गुन्ह्यांमध्ये आरोपी निर्दोष होण्याचे प्रमाण जास्त होते. त्याचा परिणाम असे गुन्हे वाढू लागले. शासनाने कायदा कठोर करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी न्यायालयीन व पोलीस स्तरावर भक्कम पुरावे, फिर्यादीचा जबाब न्यायालयात होऊ लागल्याने शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. १२ वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाºया नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाल्याने आता नराधमांना जन्मठेप नाही, तर थेट आजन्म कारावास (मरेपर्यंत) अथवा फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे.
चार वर्षांत अत्याचाराचे ३६९ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 1:01 AM