कोल्हापूर : गुंतवणुकीवर रोज एक टक्का परतावा आणि तीन महिन्यात मुदतबंद ठेव दुप्पट करून देण्याच्या आमिषाने येथील डॉ. अभिजित नारायण जांभळे ( वय ४५, रा. मिठारी मळा, मोहिते पार्क, रंगाळा पश्चिम, कोल्हापूर ) यांना दोघांनी ४९ लाख रुपयास गंंडा घातल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्नजा पोवार (रा. साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि अमोल कुलकर्णी (रा. जळगाव) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. जून २०२२ ते शुक्रवारी या दरम्यान फसवणूक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी डॉ. जांभळे आणि एका साक्षीदाराला आपण शेअर्स मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करतो असे सांगून त्यांना गुंतविलेल्या रकमेवर दररोज १ टक्काप्रमाणे परतावा देतो. तसेच तीन महिन्यांत मुदतबंद ठेवीची रक्कम दुप्पट देतो, असे संशयित आरोपींनी सांगितले होते. त्यामुळे फिर्यादी डॉ. जांभळे व साक्षीदार यांनी संशयित स्वप्नजा पोवार यांना भेटून वेळोवेळी पैशांची गुंतवणूक केली. त्या रकमेवर संशयित आरोपींनी सुरुवातीस डॉ. जांभळे आणि साक्षीदार यांना परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर डॉ. जांभळे व साक्षीदार यांनी जास्त रक्कम गुंतवल्यानंतर संशयित पोवार यांनी त्यांना परतावा देण्याचे व मुद्दल रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून फिर्यादी डॉ. जांभळे यांनी पोवार यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी संशयित आरोपी अमोल कुलकर्णी यांची भेट घालून दिली. तेव्हा त्याने डॉ. जांभळे व साक्षीदार यांना पोवार यांनीच आपल्याला पैसे दिले आहेत.
ते पैसे स्वतःची व इतर लोकांची देणी देण्यासाठी वापरले आहेत. तसेच कर्ज काढून आपले पैसे भागवितो असे सांगितले होते. त्यानंतर डॉ. जांभळे व एक साक्षीदार यांनी पोवार आणि कुलकर्णी यांना वेळोवेळी भेटून गुंतवलेल्या पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर संशयित दोघांनी विश्वास संपादन करून संगनमत करून फसवणूक केल्याची खात्री झाली. त्यामुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्यात डॉ. जांभळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पोवार आणि कुलकर्णी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक प्रीतमकुमार पुजारी करीत आहेत.अटकेनंतर होणार उलगडा
गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयितांची एकमेकांची ओळख कशी झाली, त्यांनी घेतलेले पैसे कशामध्ये गुंतवले याचा उलगडा दोन्ही संशयितांना अटक केल्यानंतर होईल, असे पोलिसांनी सांगितले.