(सतीश पाटील)कोल्हापूर: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटकातील यमगर्णी-सौंदलगा(ता.निपाणी) दरम्यान मांगूर फाट्यानजीक वेदगंगा नदीचे 5 फूट पाणी आल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. या पाण्यात अडकलेली ओमीनी गाडी सकाळी 9 वाजता वाहुन गेली आहे. पण, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या एक माल वाहतूक ट्रक पाण्यात अडकलेला आहे.
महामार्गावर पाणी आल्यामुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पाण्यामुळे पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर, कोगनोळी चेकपोस्टवरुन व हुबळी, धारवाड, बेळगाव, निपाणीकडून येणारी हजारो वाहने रस्त्यावर एका बाजूला लावली आहेत. ऐरवी राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते, पण सध्या कोरोना काळ असल्याने वाहतूक थोडी मंदावली आहेत. पण, मालवाहतूक करणारी वाहने धावत आहेत. पावसाने जोर धरल्याने राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार महामार्गावर पाणी आल्याने माल वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची अडचण झाली आहे.