कोल्हापूर : सर्वसाधारणपणे महिलांच्या शरीरात ४ ते ५ तर पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पण वैद्यकीय शास्त्रामध्ये रक्त लिटरमध्ये मोजण्याऐवजी किती हिमोग्लोबीन आहे, याचे मोजमाप केले जाते. हिमोग्लोबीनच्या प्रमाणावरून संंबंधित निरोगी आहे की नाही, यासंबंधीचा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. निरोगी असलेल्यांनी रक्तदान केल्यानंतर त्यांच्या शरीरात काहीही फरक पडत नाही. पण रक्तदानानंतर दोन दिवस भरपूर पाणी प्यावे लागते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या नावाने विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त रक्तासंबंधी विविध प्रश्न कुतूहलाने विचारले जात आहेत. रक्त सर्वांच्या शरीरात असते, पण त्या व्यक्तीलाही माहीत नसते की आपल्या शरीरात किती रक्त आहे. निरोगी पुरुषाच्या शरीरात ४ ते ५ लिटर रक्त असते. पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. पुरुषांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण १३ ते १६ ग्रॅम टक्के आणि स्त्रियांमध्ये १२ ते १४ ग्रॅम टक्के असते. इतके हिमोग्लोबीनचे प्रमाण असलेले रक्तदानासाठी आल्यानंतर एकावेळी केवळ ३५० मिलिमीटरच रक्त घेतले जाते. एका पिशवीतील रक्तातून तांबड्या पेशी, प्लाझ्मा, प्लेटलेटस, शीत अपक्षेप असे घटक वेगळे काढता येतात. गरजेनुसार यातील घटक ॲनेमिया, मलेरिया, डेंग्यू, हिमोफिलिया आणि अतिरक्तस्राव झालेल्यांना दिले जाते.
चौकट
रक्त कमी झाल्यावर कोणते आजार ?
रक्त कमी झाल्यानंतर ॲनेमिया, थॅलेसेमिया, हिमोफिलिया असे आजार होतात. अपघातामध्ये आणि महिलांमध्ये मासिकपाळी दरम्यान अति रक्तस्राव झाल्यामुळे अशक्तपणा येतो.
रक्त कमी होण्याची कारणे
सकस आहार न घेणे, आहारात पालेभाज्या कमी असणे, आयर्नयुक्त पदार्थ कमी खाण्यामुळे रक्त कमी होते. रक्तवाढीसाठी अधिकाधिक पालेभाज्या असलेले भोजन करायला हवे. मोड आलेले कडधान्य, गुळाची चिक्की खाल्ल्यानंतरही रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.
हे रक्तदान करू शकतात
रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाणत साडेबारा टक्यापेक्षा अधिक असलेले, १०० ते १४० रक्तदाब असलेले, वजन ४५ किलोपेक्षा अधिक असलेले, पल्सरेट प्रतिमिनिट ६० ते १०० असलेले रक्तदान करू शकतात.
रक्तदान केल्यानंतरची काळजी
रक्तदान केल्यानंतर दोन दिवस उन्हात कष्टाची कामे करू नये, पाणी भरपूर प्यावे, सकस आहार घ्यावा, चांगली झोप घ्यावी, धूम्रपान आणि दारू पिऊ नये, लांबचा प्रवास टाळावे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
कोट
महिलांच्या शरीरात ४ ते ५ आणि पुरुषांच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते. एका रक्ताच्या बॅगेतून विविध घटक वेगळे केल्यानंतर गरजेनुसार चार रुग्णांना वापरता येते.
डॉ. शिल्पा नारायणकर, रक्तपेढी प्रमुख, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय विभागीय रक्तपेढी