कोल्हापूर : जातीचा बोगस दाखला, लाचप्रकरण आणि अवैध बांधकाम प्रकरणात अडकलेल्या पाच विद्यमान नगरसेवकांना यंदाची निवडणूक लढविण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. माजी महापौर तृप्ती माळवी, सचिन चव्हाण, आदिल फरास यांच्यासह दिलीप पोवार यांचा त्यामध्ये समावेश आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी हरकती आल्यास या नगरसेवकांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत, अशा लेखी सूचना मुख्य निवडणूक अधिकारी पी. शिवशंकर यांनी दिल्या आहेत. सन २०१० ते २०१५ या सभागृहातील माजी महापौर तृप्ती माळवी, काँग्रेस नगरसेवक सचिन चव्हाण, दिगंबर फराकटे, सरस्वती दिलीप पोवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक आदिल फरास यांनी यंदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तृप्ती माळवी या लाच स्वीकारताना सापडल्या असून त्यांचे नगरसेवकपद राज्य सरकारने रद्द केले आहे. सचिन चव्हाण व आदिल फरास यांचे जातीचे दाखले अवैध ठरविण्यात आले आहेत. जातीचे दाखले जप्त करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत; परंतु त्यांनी या कारवाईस न्यायालयातून स्थगिती मिळविल्याचे कोणतेही आदेश मनपा प्रशासनाकडे आलेले नाहीत.नगरसेविका सरस्वती पोवार यांनी कनाननगर परिसरात अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे म्हणून प्रस्ताव प्रशासनाने महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला होता परंतु तो महासभेने नामंजूर करून त्यांना अभय दिले होते. प्रशासनाने मात्र तो मान्य केलेला नसून महासभेचा निर्णय आणि आयुक्तांचा अभिप्राय राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. त्यामुळे त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अनधिकृत बांधकामात जर एखाद्या नगरसेवकाचा हात असेल तर त्याच्या पत्नीला अथवा पतीला निवडणूक लढविता येत नाही, अशी तरतूद बीपीएमसी अॅक्टमध्ये आहे.नगरसेविका रेखा आवळे यांचा जातीचा दाखलही अवैध ठरविला असून त्यावर न्यायालयाकडून स्थगिती मिळविलेली नाही. दिगंबर फराकटे यांचे नगरसेवकपदही अन्य कारणाने रद्द ठरविण्यात आले आहे. तथापि आवळे व फराकटे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे परंतु सचिन चव्हाण, आदिल फरास, दिलीप पोवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यांना अडचणी येणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना या सर्व नगरसेवकांची नावे आणि त्यांच्यावरील कारवाईची माहिती देऊन त्यांच्या उमेदवारी अर्जावर काही हरकती आल्यास त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे लेखी आदेश दिले आहेत. सचिन चव्हाण व दिलीप पोवार यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जावर कोणी हरकत घेतलीच तर मात्र वकिलांमार्फत युक्तिवाद करावा लागणार आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या उमेदवारी अर्जावर निर्णय घेतील. दरम्यान, कुणी हरकत घेवू नये, यासाठी ते प्रयत्नरत आहेत. (प्रतिनिधी)हरकतींवर अवलंबून : छाननीची प्रतीक्षामाजी महापौर तृप्ती माळवी, सचिन चव्हाण, आदिल फरास, दिलीप पोवार, दिगंबर फराकटे यांच्या उमेदवारींवर टांगती तलवार असून, छाननीवेळी हरकती आल्यास निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेणार
पाच पदाधिकाऱ्यांना अपात्रतेचा धोका
By admin | Published: October 09, 2015 12:55 AM