कोल्हापूर : शहर परिसरात जैवविविधतेच्या घेण्यात आलेल्या नोंदीनुसार झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरू, सरपटणारे प्राणी, मासे, सस्तन प्राणी अशा एकूण ८०६ प्रजाती आढळून आल्याची माहिती महापालिकेतील जैवविविधता समितीच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.या नोंदीमध्ये झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे यांच्या ४६६ प्रजाती, पक्षी २३१ प्रजाती, फुलपाखरू ३५ प्रजाती, सरपटणारे प्राणी २५ प्रजाती, मासे २६ प्रजाती, सस्तन प्राणी २३ प्रजाती, अशा एकूण ८०५ प्रजातींचा समावेश आहे.महापालिका अधिकार क्षेत्रातील जैवविविधता नोंदीबाबत झालेल्या चर्चेप्रमाणे बैठकीत नोंदवहीस मान्यता देण्यात आली. स्थानिक स्तरावरील तज्ज्ञांच्या सहायाने जैवविविधतेबाबत माहिती संकलित करून नोंदवही प्राथमिक टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात आली. निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर, सचिव अनिल चौगुले, विज्ञान प्रबोधनी संस्थेचे उदय गायकवाड, मच्छिमार संस्थेचे प्रतिनिधी अमर जाधव, वनविभाग कोल्हापूर यांच्या मागदर्शनाखाली ही माहिती संकलित करण्यात आली आहे.बैठकीत जैवविविधता कार्यप्रणाली यशस्वीरित्या राबविण्याकरिता पुढील आर्थिक वर्षामध्ये स्वतंत्र तरतूद करण्याची सूचना करण्यात आली. तसेच महापालिकेच्या ५४ उद्यानांपैकी एका उद्यानामध्ये तुळस, कोरफड, आवळा, अडुळसा इत्यादी वनऔषधी वृक्षांची लागवड करून वनऔषधी उद्यान विकसित करण्याबाबत, तसेच महावीर उद्यानातील मत्सालयात विविध जातीचे मासे नव्याने उपलब्ध करून पर्यटक आकर्षित होतील याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
अग्निशामन विभागामार्फत अहिंसक पद्धतीने मधमाश्यांचे पोळे काढण्याकरिता आवश्यक पोशाख खादी ग्रामोद्योग विभागाकडून खरेदी करावा, अशी सूचना महापौर लाटकर यांनी केली.उदय गायकवाड यांनी कै. नीलिशा देसाई यांच्या कुटुंबामार्फत मधमाश्यांचे पोळे काढण्यासाठी आवश्यक असलेले किमान दोन पोशाख महापालिकेस देणार असल्याचे सांगितले. या अनुषंगाने समितीमधील रिक्त पदी शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. असावरी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मत्स्य विभागचे सुदर्शन पावसे, कृषी महाविद्यालयाचे डॉ. ए. जी. भोईटे, उद्यान अधीक्षक अनिकेत जाधव, सहायक अधीक्षक अपर्णा जाधव उपस्थित होते.