परवडणारी घरे म्हणून म्हाडाची ओळख आहे. त्यामुळेच या सोडतीकडे बऱ्यापैकी लक्ष असते. पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना यामुळे या घरांची किंमत कमी राहते.
एकूण ५ हजार ६४७ पैकी ५ हजार २१७ घरे ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यातील म्हाळुंग येथे ५१४, तळेगाव दाभाडे येथे २९६, सोलापुरातील करमाळ्यात ७७ तर सांगलीत ७४ अशी ९६१ घरे आहेत. म्हाडाकडून बांधलेल्या प्रकल्पात पुण्यातील मोरेवाडीत ८७, पिंपरी वाघिरे ९९२, तर सांगलीत १२९घरे आहेत. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या योजनेतंर्गत म्हाळुंगे येथे १८८०, दिवे येथे १४, सासवडला ४, सोलापुरात ८२ घरे आहेत. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतंर्गत पुणे महापालिका हद्दीत ४१०, पिंपरी-चिंचवड महापलिका हद्दीत १०२०, कोल्हापूर महानगरपालिकेत ६८ घरे उपलब्ध आहेत.
सवलतीचे घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुरुवारपासून म्हाडाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणीस सुरुवात झाली. ११ जानेवारीपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर लकी ड्रॅा पद्धतीने सोडत काढली जाणार आहे. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.