कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव, तसेच रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने खाजगी रुग्णालयांच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्याकरिता महापालिका प्रशासनाने गुरुवारी ५० लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्वांवर संनियंत्रण अधिकारी म्हणून महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट (९७६६५३२०१२) या कामकाज पाहणार आहेत.
खाजगी रुग्णालयाच्या बिलांवर नियंत्रण ठेवण्याकरिता मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नियुक्त केली आहेत. याबरोबरच प्रत्येक रुग्णालयात बिल तपासणीसाठी लेखाधिकारी व वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित रुग्णालयांनी या अधिकाऱ्यांकडून बिलाची तपासणी झाल्यानंतर रुग्णांकडून बिलाची रक्कम स्वीकारायची आहे.
शहरातील खाजगी रुग्णालयात शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जादा दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी मागील वर्षी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून या लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या रुग्णालयात कोण लेखाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, तसेच त्यांचे मोबाइल क्रमांक याची माहिती ज्या- त्या रुग्णालयात, तसेच महानगरपालिकेतील जनसंपर्क कार्यालयात मिळणार आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाकडून बिल मिळाल्यानंतर ते महापालिका नियुक्त लेखाधिकाऱ्यांकडून बिलाची पडताळणी करूनच बिल अदा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.