जिल्ह्यात दि. १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये एकूण ७,३७,६४८ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ई-वन आणि ई-टू प्रकारातील एकूण ५० बालके शाळाबाह्य आढळली. त्यापैकी २७ जण हे विशेष गरजाधिष्ठित (दिव्यांग) असून, अन्य कारणांमुळे सहा जण शाळाबाह्य झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्यात १७ मुले शाळाबाह्य असून, त्यापाठोपाठ शिरोळ (९), राधानगरी (७) तालुक्याचा क्रम आहे. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने कोल्हापूर शहरातील ८२८५७ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. त्यात ३ ते १८ वयोगटांतील ७२२२२ बालके आढळून आली. त्यामध्ये साने गुरुजी वसाहत, रंकाळा तलाव, राजारामपुरी, टेंबलाईवाडी, तपोवन, मंगळवारपेठ परिसरातील एकूण १२ बालके शाळाबाह्य आढळली. त्यात ई-वनमधील आठ, तर ई-टूमधील चार बालके आहेत. या दोन्ही प्रकारांत नऊ बालके ही दिव्यांग आहेत.
चौकट -
हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक
हातकणंगले तालुक्यात ई-वन आणि ई-टू प्रकारातील सर्वाधिक १७ बालके शाळाबाह्य आहेत. त्यात इचलकरंजीतील बालकांचा समावेश आहे. या ठिकाणी रोजगारानिमित्त येणाऱ्या स्थलांतरित कुटुंबांची संख्या अधिक असल्याने शाळाबाह्य बालकांचे प्रमाण जादा आहे.
चौकट
४९ टक्के मुली
या शाळाबाह्य बालकांमध्ये ४९ टक्के मुली आहेत. त्यात ई-वनमधील ७ आणि ई-टूमधील १७ मुली आहेत.
चौकट
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, अंगणवाडी सेवक अशा सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांनी गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्थानक, बसस्थानक, ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केले. शहरात १२०० कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले.
प्रतिक्रिया
या सर्वेक्षणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात जी बालके शाळाबाह्य आढळली आहेत. त्यांना शाळेत दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
स्थलांतरित ६८ बालकांना शाळेत दाखल केले आहे. उर्वरित १२ मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची सूचना संबंधित शाळांना केली आहे.
-एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर.
शाळाबाह्य मुले कोणत्या तालुक्यात किती?
हातकणंगले : १७
शिरोळ : ९
राधानगरी : ७
करवीर : ६
शाहूवाडी : २
भुदरगड : १
===Photopath===
290321\29kol_8_29032021_5.jpg
===Caption===
(२९०३२०२१-कोल-आऊट ऑफ स्कूल डमी)