कोल्हापूर : पंचगंगा पुलावर पांढºया लहान कीटकांचे मोठ्या प्रमाणात थवे आल्याने या ठिकाणी सुमारे पन्नासहून अधिक मोटारसायकली घसरून पडल्या. यात अनेकजण जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
पुणे-बंगलोर महामार्गावर सायंकाळी सात वाजता पंचगंगा नदीच्या पुलावर तेलकट पांढºया पंख असणाºया कीटकांचे थवेच्या थवे आले. त्यांनी पंचगंगा नदीवरील तिन्ही पूल व्यापल्याने वाहनधारकांना रस्ताच दिसत नव्हता. अनेक मोटारसायकलस्वारांच्या डोळ्यात हे किडे गेले. तसेच रस्त्यावर पसरलेल्या तेलकट किड्यावरून सुमारे पन्नासहून अधिक मोटारसायकली घसरून पडल्या. अनेकजण यात जखमी झाले आहेत. अनेक वाहनधारकांनी इतर वाहनांना थांबवून अपघात होण्यापासून वाचविले.
या किड्यांमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत होऊन कोंडी झाली होती.रात्री नऊ वाजता महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले होते. त्यांनी पाणी मारलेव संपूर्ण रस्ता स्वच्छ केला. रात्री उशिरापर्यंत हे किडे हटविण्याचे काम सुरू होते, तर वाहतूक सुरळीत करण्याचे काम महामार्ग आणि शिरोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत होते
पांढरे कीटक म्हणजे वाळवी आहे. पावसाळा संपण्याच्या सुमारास प्रौढ अळ्या जमिनीतून वर येतात. मिलनासाठी त्यांना पंख फुटतात. त्यांचे मिलन झाल्यानंतर मादी वाळवीचे पंख गळून पडतात. ती पुन्हा जमिनीत जाऊन अंडी घालते. मिलनावेळी ती उजेडाच्या दिशेने येत असल्याने महामार्गावरील वाहनांच्या दिव्यांसमोर मोठ्या संख्येने आली.- डॉ. ए. डी. जाधव, साहाय्यक प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ.