कोल्हापूर : ‘सीपीआर’मधील शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या कमी झालेल्या ५0 जागा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, त्याला १00 टक्के यश येईल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला. डॉ. लहाने यांनी शुक्रवारी दिवसभर ‘सीपीआर’मधील सर्व विभागांची पाहणी केली. सर्व डॉक्टरांसह अधिष्ठातांचीही बैठक घेतली.‘सीपीआर’अंतर्गत कार्यरत असलेल्या शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या १५0 जागांपैकी ५0 जागा यावर्षीपासून कमी झाल्यासंदर्भात विचारले असता, डॉ. लहाने म्हणाले, ‘तपासणीवेळी काही त्रुटी आढळल्यामुळे या जागा कमी होण्याची नामुष्की ओढवली होती.
आता यासंदर्भात पुन्हा एकदा तपासणी सुरू झाली आहे. ती काटेकोरपणे केली जात आहे. मागील तपासणीत झालेल्या त्रुटींची पूर्तता करण्यावर भर दिला जात आहे. या तपासणीत सकारात्मक चित्र दिसत आहे; त्यामुळे कमी केलेल्या जागा परत देण्याबाबत सकारात्मक अहवाल दिला जाणार आहे.’औषध तुटवड्यासंदर्भात विचारले असता, डॉ. लहाने म्हणाले, ‘महामंडळाकडून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया संपल्यानंतर तीन महिन्यांत औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. एमआरआय मशीनच्या खरेदीबाबतीत देवस्थान समित्यांना निधी देण्याबाबत आवाहन केले होते. त्याचे आतापर्यंत ९0 कोटी रुपये जमले आहेत. यातून प्रत्येकी १५ कोटी किमतीचे सहा मशिन्स घेतली जाणार आहेत, त्यापैकी एक ‘सीपीआर’ला दिले जाणार आहे.कोल्हापुरात सरकारी कॅन्सर रुग्णालयाचा प्रस्तावकॅन्सरचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कॅन्सर रुग्णालय व्हावे, असा मागणी प्रस्ताव आमदार अमल महाडिक यांनी आपल्याकडे दिला होता, त्यासाठी २0 कोटींचा निधीही त्यांनी मंजूर करून आणला आहे. हे रुग्णालय पूर्णत्वास जाण्यासाठी सहकार्य करू असेही डॉ. लहाने यांनी सांगितले.