कोल्हापूर/शिराली : देशातील ३७२ टोलनाके बंद करावेत, यासह अन्य मागण्यांकरिता पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पाचव्या दिवशी सोमवारी पुणे-बंगलोर महामार्गावरील उचगाव येथे परराज्यातून येणारे ५० हून अधिक मालवाहतूक ट्रक व वाहने कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अडवून त्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडली. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान वरीष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीनुसार सोमवारी रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याची माहिती जिल्हा लॉरी आॅपरेटर असो.चे अध्यक्ष सुभाष जाधव व खजानीस प्रकाश केसरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे आज, मंगळवारपासून मालवाहतूक सुरळीत सुरू राहील.१ आॅक्टोबरपासून आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने हे देशव्यापी आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३२५ कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सोमवारी सकाळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव व उपाध्यक्ष भाऊसाहेब घोगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उचगावजवळ दुतर्फा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. परराज्यांतून येणारे ट्रक, टँकर, आदी अवजड वाहने अडविली. सुमारे ५० हून अधिक वाहनांची हवा त्यांनी सोडली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लॉरी आॅपरेटर व धान्य व्यापारी संघ, अन्य संबंधित संघटनांना जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी चर्चेसाठी पाचारण केले होते. यामध्ये रेशनिंगचे धान्य, दूध वाहतूक, गॅस, पेट्रोल, रॉकेल यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी मालवाहतूक रोखू नये, असे सैनी यांनी बैठकीत बजावले. यावर पदाधिकाऱ्यांनी हा संपच मागे घेतल्याची माहिती दिली. पुणे-बंगलोर महामार्गावर नागाव फाटा येथे लॉरी असोसिएशनने संपात सहभागी न होणारे दोनशे ट्रक अडवून त्यांची कागदपत्रे काढून घेतली होती.
५० वाहनांतील सोडली हवा
By admin | Published: October 06, 2015 1:05 AM