यवलूज : यवलूज ( ता पन्हाळा ) येथील बाबूराव शंकर पवार (गवळी) यांनी तेलवे येथील पुष्पलता विश्वजीत भोसले यांचे रस्त्यात सापडलेले ५० हजार रुपये प्रामाणिकपणाने परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाबूराव पवार हे बुधवारी सकाळी जनावरांसाठी मित्रांबरोबर वैरण पाहण्यासाठी बाहेरगावी गेले असता परत येताना त्यांना यवलूज - पोर्ले बंधाऱ्याशेजारी रस्त्यावर आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून वरणगे येथील पाहुण्यांच्या घरी जात असलेल्या तेलवे ( ता. पन्हाळा ) येथील पुष्पलता भोसले यांची पर्स सापडली त्यामध्ये विविध महत्त्वाच्या कागदपत्रांसह रोख ५० हजार रूपये व किमती मोबाईल होता. पुष्पलता भोसले या बॅंकेचा हप्ता भरण्यासाठी वरणगे येथून कोल्हापूरला जाणार होत्या मात्र वाटेतच त्यांची पर्स पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पण काही वेळातच ती त्यांना प्रामाणिकपणे परत मिळाली. फोटो ओळ- यवलूज येथे बाबूराव पवार यांनी पुष्पलता भोसले यांचे रस्त्यात सापडलेले पैसे व कागदपत्रे भोसले कुटुंबीयांना सुपुर्द केली.