लोकमत न्यूज नेटवर्क
सांगरुळ (वार्ताहर) : थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले असून, लवकरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यास आम्ही कटिबध्द असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
सांगरुळ (ता. करवीर ) येथे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नागरी सत्कार समारंभ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सांगरूळ शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती चाबूक होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पाच जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर जिल्ह्याचा एज्युकेशन इंडेक्स वाढविण्यासाठी आमदार जयंत आसगावकर यांनी प्रयत्नशील रहावे. रस्ते, गटर्सवर निधी खर्च न करता शाळांना सुविधा देण्यास प्राधान्य द्या. आमदार पी. एन. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून कार्यरत असून, शेतकऱ्यांसह इतर घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. आमदार जयंत आसगावकर म्हणाले, आघाडीच्या नेत्यांमुळे आपणाला ही संधी मिळाली असून, या संधीचे सोने केल्याशिवाय आपण राहणार नाही. आगामी काळात शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही राहू. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. सरंपच सदाशिव खाडे यांनी स्वागत केले. भगवान लोंढे यांनी प्रास्ताविक केले. आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, ‘गोकुळ’चे ज्येेष्ठ संचालक विश्वास पाटील, ॲड. सुरेश कुराडे, ‘कुंभी’चे उपाध्यक्ष निवास वातकर, इंदूताई आसगावकर, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुरेश कुराडे, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, इंदुताई आसगावकर, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या विजयासाठी पवार यांचा आग्रह
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपणास फोन केल्याचे सांगत, जयंत आसगावकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील रहाण्यास सांगितले. काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणा म्हणून पवार यांनी सांगण्याची माझ्या आयुष्यातील पहिलीच वेळ असल्याचा टोला पी. एन. पाटील यांनी लगावला.
फोटो ओळी : सांगरूळ (ता. करवीर) येथे आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कृष्णात चाबूक, इंदूताई आसगावकर, निवास वातकर, विश्वास पाटील, बजरंग पाटील, सुरेश कुराडे, निवृत्ती चाबूक, पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब खाडे, सदाशिव खाडे, सभाष सातपुते उपस्थित होते. (फोटो-२६१२२०२०-कोल-सांगरूळ) (छाया- राज मकानदार)