कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नियमित व प्रामाणिकपणे कर्ज फेडतो. अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सूचना करून किती रक्कम लागते ती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. लाडक्या बहिणींसाठी सहा हजार कोटी वर्ग करूनच राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडलो आहे, असेही ते म्हणाले.येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ, बाजार समिती सभापती प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, आमरीन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विलास गाताडे, वसंतराव धुरे, सतीश पाटील, सुधीर देसाई, चंद्रकांत गवळी आदी प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. निवडणुकीकरिता माझ्यासाठी कार्यकर्ते सहा महिन्यांपासून सज्ज झाले आहेत. प्रवीण काळबर, विजय काळे, शीतल फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांची भाषणे झाली. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत केले. नितीन दिंडे यांनी आभार मानले.
मंत्री मुश्रीफांची उमेदवारी जाहीरउपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागे एकदा मुश्रीफांना पालकमंत्री करू शकलो नाही, ही खंत यावेळी दूर केली. त्यांच्या मागे असणारी ताकत कागलकरांनी कधीच कमी केलेली नाही. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना इतक्या उच्चांकी मताने निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे. त्याकरिता मी कमी पडणार नाही.
मुश्रीफांनी मागितली माफीमेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. सभामंडपाबाहेर लोक दाटीवाटीने उभा होते. यशवंतराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणात स्क्रीन उभारला होता. तेथेही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पावसामुळे एवढे लोक येणार नाहीत म्हणून ही जागा घेतली. यामुळे गैरसोय झाली. याबद्दल मुश्रीफ यांनी भाषणात माफी मागितली.