लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना येणाऱ्या तक्रारींमुळे व इच्छुकांनी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन अर्ज) स्वीकारण्याची मुभा देत वेळेतही वाढ केली आहे. आज, बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकतात.
जिल्ह्यात सध्या ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे. निवडणूक आयोगाने सुरुवातीला केवळ ऑनलाईन अर्ज भरून ते ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगितले हाेतेे. मात्र, सोमवारपासून इंटरनेटची गती कमी, सर्व्हरच्या अडचणी अशा तक्रारी आयोगाकडे येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन इच्छुक व्यक्ती उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) अर्ज स्वीकारण्याचा व तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधितांना याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज व घाेषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुकांना देण्याची व्यवस्था करावी, असे सांगितले आहे. ऑफलाईन पद्धतीने आलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने भरून घ्यावेत, अशीही सूचना आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी केली आहे.
---
जातपडताळणीबाबत नाराजी
जातपडताळणी कार्यालयात ऑनलाईन अर्ज सादर करताना येत असलेल्या अडचणींबाबत उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत तक्रार केली होती. जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीअभावी अर्जदारांची गैरसोय होऊ नये यासाठी बार्टीचे प्रभारी उपायुक्त तथा प्रकल्प संचालक मेघराज भाते यांनी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत, अर्ज स्वीकारण्याचे टेबल, खिडकी वाढवावी, कार्यालय पूर्णवेळ तसेच आवश्यकतेप्रमाणे सर्व अर्जदारांचे अर्ज स्वीकारेपर्यंत सुरू ठेवावीत. ज्यांचे ऑफलाईन अर्ज आले आहेत त्यांच्यासोबत तक्त्यात माहिती भरून १ जानेवारीपर्यंत पाठवावी, अशा सूचना केल्या आहेत.
(फोटो व ओळी स्वतंत्र पाठविल्या आहेत. त्या वापराव्यात)