मलकापूर : जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात अधिक गतिमान करून भूगर्भातील कमी होत असलेली पाणी पातळी वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. यंदा या अभियानांतर्गत ६९ गावांची निवड करून त्यासाठी ५४ कोटींचा आराखडा तयार केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिली. करंजफेण (ता. शाहूवाडी) येथे परिसरातील २५ गावांसाठी आयोजित केलेल्या महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचा प्रांरभ जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार सत्यजित पाटील, शाहूवाडीचे सभापती पंडितराव नलवडे, उपसभापती पांडुरंग पाटील, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, आर. एस. चोबे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. सैनी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान शासन आणि लोकसहभागातून गतिमान करून आगामी काळात जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्याचा संकल्प आहे. यासाठी २० कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात येतील. सेवा हमी कायद्यानुसार २१ दिवसांच्या आत जातीचा दाखला न दिल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. सत्यजित पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात लोकसहभागातून अधिक गतिमान व्हावे. सभापती नलवडे, प्रांताधिकारी खाडे, उपसभापती पाटील, डॉ. नितीन पाटील यांची यावेळी भाषणे झाली. तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी स्वागत केले. नायब तहसीलदार बाजीराव पाटील, सरपंच दर्शना फाटक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शिबिरात शासनाच्या योजनेतून लाभार्थ्यास ट्रॅक्टर वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)
‘जलयुक्त शिवार’चा ५४ कोटींचा आराखडा
By admin | Published: November 05, 2015 11:24 PM