कोल्हापूर : केवळ राजकीय सुडापोटी सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या कारभारामुळे चारच महिन्यात गोकूळ दूध संघाला ५५ कोटींचा फटका बसल्याचा आरोप गोकूळमधील विरोधी संचालक शौमिका महाडिक यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केला.
महाडिक म्हणाल्या, नशिबाने सत्ता मिळाली आहेे; पण त्याचा उपयोग सूड उगवण्यासाठी केला जात आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची माहिती देत नाहीत, प्रोसिडिंग लपवले जाते. निवडणुका जर ऑफलाइन घेता येतात, मग सर्वसाधारण सभा का ऑनलाइन आहे, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे. कायम कर्मचाऱ्यांकडून जादा काम करवून घेऊन ओव्हरटाइम दिला जात आहे, मग खर्च कसा वाचवला हे सांगावे.
माजी संचालक रणजित पाटील म्हणाले, गोकूळ दूध संघाचा कारभार हा पत्त्याच्या बंगल्यासारखा आहे. यातील एक पान जरी हलले तर सगळा बंगला भुईसपाट होईल याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवावे.
वाशी प्रकल्पासाठी घाईगडबड नको
मुंबईतील वाशी येथील जागा व युनिट उभारणीसाठी ३२४ कोटी रुपयांचे कर्ज काढले जाणार आहे. गोकूळचे सध्या १३० कोटी कर्ज डोक्यावर आहे. प्रकल्प खर्च वाढवून ही रक्कम ५०० कोटींवर जाणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून तो बाेजा कोणावर टाकणार, अशी विचारणा महाडिक यांनी केली.
विरोधी तिघे संचालक गायब..
विरोधी आघाडीतून निवडून आलेले अंबरिश घाटगे, बाळासाहेब खाडे व चेतन नरके यावेळी उपस्थित नव्हते. त्याबद्दल महाडिक यांना विचारल्यावर त्यांनी सावरासावर केली. यावेळी माजी संचालक धैर्यशील देसाई उपस्थित होते.