एकनाथ पाटील ।कोल्हापूर : परिक्षेत्रामध्ये मटका, जुगार, चोरटी दारू बंद करण्यामध्ये असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवत १४६ पोलीस ठाण्यांपैकी ५५ पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटिसा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाठविल्या आहेत. नोटिसामध्ये तुम्ही संबधित पोलीस ठाण्याचा पदभार सांभाळण्यामध्ये असमर्थ आहात. तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकारही नाही. यासंबधी आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिल्याने पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जनतेत विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाºयांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. लाचखोरीच्या घटनांमुळे ‘सदरक्षणाय: खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याला कलंक लागत आहे. पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्णांतील मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे व छुपी ‘हप्ता सिस्टीम’ बंद करण्याचे लेखी आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांसह उपअधीक्षक, निरीक्षकांना दिले होते; परंतु हा आदेश फक्त कागदावरच राहिला.
एकीकडे विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचेच काही सहकारी लाच घेत खाकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येऊ लागले. ‘हप्ता वसूल करणारे खाते’ अशी पोलीस खात्याची ओळख निर्माण झाली. खाकी वर्दीला खूश ठेवून अवैध व्यवसायांचे जाळे पसरविणारे पंटर उजळ माथ्याने आज फिरताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीचे नाते न जोडता गुन्हेगारांशी पोलिसांची सलगी वाढली आहे. ‘रक्षकच भक्षक’ होऊ लागल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास उतरलेला आहे.
या सर्व सिस्टीमला चाप लावण्यासाठी नांगरे-पाटील यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकांची टीम बनवून त्यांना परिक्षेत्रातील १४६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकण्याचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत या पथकाने छापे टाकले. त्यामध्ये मटका, जुगार, दारू, वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार नांगरे-पाटील यांनी अशा ५५ पोलीस निरीक्षकांना ‘शो कॉज’ नोटिसा पाठविल्या. त्यासंबधी आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नांगरे-पाटील यांच्या कठोर भूमिकेमुळे पोलीस निरीक्षकांचे धाबे दणणाले आहेत.निरीक्षकाने मागितली स्वत:हून बदलीकोल्हापूर शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना ‘शे कॉज’ नोटिसा पाठविल्या आहेत. यापैकी एका निरीक्षकाला दोनवेळा ही नोटीस बजावल्याने त्यांनी स्वत:हून बदलीसाठी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे याठिकाणी लवकरच नवीन अधिकारी देण्याच्या हालचाली वरिष्ठ स्तरावर सुरू आहेत.कौतुकास्पद कामगिरीसांगली-मिरज येथील ४३ ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक दीपाली गौरे-पाटील यांनी छापे टाकून अवैध धंदे मोडीत काढले. त्यांच्या या कामगिरीबद्दल नांगरे-पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
कोल्हापूर परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचे आदेश देऊनही काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित पोलीस निरीक्षकांना ‘ शे कॉज’ नोटिसा पाठविल्या आहेत. अवैध धंद्यांना पाठीशी घालणाºया कुठल्याही अधिकाºयाची गय केली जाणार नाही.- विश्वास नांगरे-पाटील,विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र.