कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने (सीबीएसई) बारावी परीक्षेतील उर्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांना आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे गुण या बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळणार आहेत. परीक्षा रद्दच्या निर्णयावरून पालक, विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.या बोर्डाकडून दि. २७ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू झाली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे उर्वरित आणि ऐच्छिक विषयांचे पेपर स्थगित करण्यात आले. या पेपरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सीबीएसईने गुरुवारी (दि. २५) जाहीर केला. त्यावर लोकमतने कोल्हापूर जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रतिक्रिया, किती विद्यार्थ्यांना सरासरी गुण मिळणार, आदींचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील एकूण १० शाळांमधील ५५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. त्यातील विज्ञान, वाणिज्य विद्याशाखेचे बहुतांश पेपर झाले आहेत. मराठी, हिंदी, भूगोल, इन्फर्मेटिक प्रॅक्टिस, बिझनेस स्टडीज, कॉम्प्युटर सायन्स, आदी पेपर रद्द करण्यात आले आहेत. या विषयांसाठी शाळांनी त्याच विषयाच्या आधी घेतलेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना सरासरी गुण दिले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना त्यांची प्रगती नेमकी समजण्यासाठी आणि करिअरची दिशा ठरविण्याकरिता स्वत:च्या क्षमतेची माहिती होण्यासाठी परीक्षा होणे आवश्यक होते. शालेय शिक्षणाला ऑनलाईन शिक्षण हा पर्याय नाही.- ललित गांधी, अध्यक्ष, महावीर एज्युकेशन सोसायटी
वर्षभर मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उर्वरित पेपर रद्दचा निर्णय अयोग्य ठरणारा आहे. सध्या अन्य इयत्तांचे विद्यार्थी हे वर्गात येत नाहीत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखून अथवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य होते.- सीमा फाटक, पालक
कोरोनाच्या सद्य:स्थितीचा विचार करता ह्यसीबीएसईह्णने बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.- डॉ. सरदार जाधव,संचालक, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठवडगाव
बारावीचे बहुतांश महत्त्वाचे पेपर पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून बोर्डाने उर्वरित पेपर रद्द करण्याचा घेतलेला निर्णय मला योग्य वाटतो.- ऋषिकेश कुलकर्णी, विद्यार्थी
पेपर रद्द करून त्यांचे सरासरी गुण देण्याच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. या पेपरची परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घ्यायला हवी होती.- राजेंद्र दायमा, अध्यक्ष, इंडीपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- बारावीच्या शाळा (सीनिअर सेकंडरी स्कूल) : १०
- विद्यार्थिसंख्या : ५५०
- दहावीच्या शाळा (सेकंडरी स्कूल) : २८
- विद्यार्थिसंख्या : ३८००