कोल्हापूर : कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ५ हजार ५६६ नोंदी सापडल्या आहेत. यातील सर्वाधिक नोंदी या कागल व करवीर तालुक्यातील आहेत. मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात आढळतील, असा अंदाज आहे.मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोल्हापुरातही जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्व तहसील कार्यालयांसह कोल्हापूर पुरालेखागार कार्यालय व कळंबा कारागृहातील नोंद वहीमध्येही कुणबी नोंदी आढळल्या आहेत.कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूलकडेच असणार आहेत. त्यामुळे तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह जेलचे पोलिस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी अशा वेगवेगळ्या गटातील सर्व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत. त्यासाठी सर्व रेकॉर्ड तपासले जात आहे. मराठवाड्यात कुणबी नाेंदीची शोधमोहीम आधी सुरू झाली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात त्याहून अधिक नोंदी असतील, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. या शोधमोहिमेबाबत रोजच्या रोज अहवाल घेतला जात आहे. पण रेकॉर्ड व कागदपत्रे मोठ्या संख्येने व तुलनेने काही विभागांमध्ये कर्मचारी जास्त असल्याने नोंदी शोधण्याला कालबद्धता दिलेली नाही.
विभाग : आढळलेल्या नोंदीकागल : १ हजार १८५करवीर : १ हजार १०४भुदरगड : ९९२आजरा : ७१९पन्हाळा : ६००हातकणंगले : ४३२राधानगरी : २७१गगनबावडा : १५२नगरपालिका : ९५पुरालेखागार कार्यालय : ८गडहिंग्लज : ५कळंबा कारागृह प्रशासन : ३एकूण : ५ हजार ५६६
कागलमध्ये सर्वाधिक..दोन दिवसांत कागल तालुक्यातील कुणबीच्या नोंदी सर्वात जास्त आढळून आल्या आहेत. चंदगड आणि शिरोळ या दोन मोठ्या तालुक्यात पहिल्या दिवशी एकही कुणबी दाखला आढळून आला नाही.