कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २४ मार्च (रविवारी) सकाळी दहा ते दुपारी बारा कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १८ हजार विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपी अथवा गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे, अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत.
परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांची पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक अथवा भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले.