कोल्हापूर : राज्यभर जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाल्याने एसआयटी चौकशी लागली असली तरी कोल्हापुरात मात्र पाच वर्षांत १०० टक्के काम झाल्याचे शासकीय अहवाल सांगतो. या कामाविषयी तक्रारी नाहीत, असा दावा सरकारी यंत्रणेकडून केला जात असला तरी पुढचे पाठ, मागचे सपाट अशीच परिस्थिती या जलयुक्त कामांची झाल्याचे वास्तव आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५६ कोटी ५१ लाखांची कामे झाली आहेत.भाजप सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार अभियान जोरात राबवले गेले. या कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचारावर ह्यकॅगह्णनेही ताशेरे ओढल्याने अखेर एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय विद्यमान महाविकास आघाडीने सरकारने केला आहे. यावरून आजी-माजी सत्ताधाऱ्यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील या अभियानाचा आढावा घेतला असता कागदोपत्री शंभर टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसते. कृषी विभागाच्या नियंत्रणाखाली सुरू असलेल्या या अभियानाने सर्व सरकारी विभागांना सोबत घेत काम पूर्णत्वासह निधीही खर्च केला आहे.
पाच वर्षांत झालेल्या कामामुळे नऊ हजार ७८३ टीसीएम पाण्याची साठवणूक क्षमताही वाढीस लागली आहे. यात मोठे काम होते, ते कळंबा तलावातील गाळ काढणे, जाखले व तमदलगेसह जोतिबा डोंगरावरील तलावांचे पुनरुज्जीवन करणे. यात चांगले यशही आले आहे.तथापि इतर लहानसहान कामांच्या गुणवत्तेच्या बाबतीत तडजोडी केल्याने ही कामे केली होती का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती गावागावांत झाली होती. लोकसहभागातून कामे करावयाची असताना आणि कुशल-अकुशलचा रेशो सांभाळायचा असतानाही जेसीबीसारख्या यंत्रांनी कामे झाले आहेत. ठेकेदारांना पोसण्याचे काम या योजनेने चांगल्या प्रकारे केले.
- निवडलेली गावे : १८०
- पाच वर्षांसाठीचा मंजूर आराखडा : ७१ कोटी ७७ लाख
- आराखड्यानुसार मंजूर कामे : २३५४
- पूर्ण झालेली कामे : २३५४
- खर्च झालेला निधी : ५६ कोटी ५१ लाख ७४ हजार
- सिंचन क्षमता : ९ हजार ७८३ टीसीएम
ही झाली कामेतलावांतील गाळ काढणे, शेततळे, माती नालाबांध, सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, सलग समतल व खोल चर अशी कामे झाली आहेत.
जिल्ह्यात जलयुक्तचे शंभर टक्के काम झाले असून निधीही खर्च पडला आहे, शासनाने मागवलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा अहवाल पाठवला आहे.- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर