कोल्हापूर : जिल्ह्यात लसीकरणासाठी कोरोना प्रतिबंधक लस ही दोन दिवसांपुरती शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिवसभरामध्ये ५६ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. यामध्ये कोविशिल्डच्या दुसऱ्या डोससाठीच्या २० हजार डोसचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढली आहे. प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्वत:सह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करून तालुक्यांची जबाबदारी दिल्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक असल्याचे बुधवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. याची दखल घेत आरोग्य विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिवसभरामध्ये ५६ हजार डोस उपलब्ध करून दिले आहेत. आरोग्य उपसंचालक कोल्हापूर यांनी कोव्हॅक्सिनचे ११,६०० डोस उपलब्ध करून दिले आहेेत, तर याच कंपनीचे ३६ हजार डोस आरोग्य विभागाच्या पुणे मुख्यालयातून पाठवण्यात आले आहेत. यातील दहा हजार डोस गुरुवारी संध्याकाळीच तालुक्यांना रवाना करण्यात आले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीपासून कोविशिल्ड लस देण्यात आली होती. मात्र आता ती बंद करून कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. परंतु ज्यांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना याच कंपनीचा डोस देणे आवश्यक असल्याने कोविशिल्डचे २० हजार डोस जिल्ह्यासाठी मिळाले आहेत.
चौकट
दिवसभरात १६ हजारांवर नागरिकांना लस
गुरुवारी दिवसभरामध्ये जिल्ह्यातील १६ हजार ८० जणांना लस देण्यात आली. यामध्ये दुसरा डोस घेतलेल्या ९३४ जणांचा समावेश आहे. ३७७ आरोग्य कर्मचारी, १०८३ फ्रंट लाइन वर्कर, ४५ ते ६० वयोगटातील २८९४ जणांचा, तर ६० वर्षांवरील दहा हजार ७९२ जणांनी लस घेतली आहे.
कोट
कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे दर तीन, चार दिवसांनी आम्ही नवी मागणी नोंदवत आहोत. त्यानुसार पुरवठा होत असून, लसीचा तुटवडा पडू नये यासाठी सर्वच पातळ्यांवरून दक्षता घेतली जात आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी