राधानगरी : राधानगरी तालुक्यात चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी थोडीशी उसंत घेतली; मात्र काल त्याने रौद्ररूप घेतल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. म्हासुर्ली परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडाला आहे. कोनोली येथे झालेल्या भूस्खलनामुळे काही घरे गाडली. यात दोन व्यक्तीसह अनेक जनावरे दगावली. काल दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात तब्बल ५६७ मिलिमीटर व काळम्मावाडी येथे ४८० मिमी पाऊस झाला.
भोगावती नदीवरील बहुतेक बंधारे व धरणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली. परिते-गैबी राज्यमार्गावर घाटात मोठा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी पाच वाजता राधानगरी धरणातील पाणीसाठा ८ टीएमसीवर गेला. धरण पूर्ण भरण्यास साडेचार फूट पाणी कमी आहे. उद्या स्वयंचलित दरवाजे सुरू होण्याची शक्यता आहे. काळम्मावाडी धरणातील पाणीसाठा १४ टीएमसी झाला असून तो क्षमतेच्या ७0 टक्के आहे. पडळी-दाजीपूर मार्गावर राऊतवाडी धबधब्याजवळ दरड कोसळली त्यामुळे येथील वाहतूक खंडित झाली.
दुर्गम असलेल्या पाटपन्हाळा मार्गावरही मोठ्या प्रमाणात डोंगराचा भाग रस्त्यावर आला आहे. त्यामुळे या गावचा संपर्क तुटला आहे. सोळांकुर घाटात अनेक ठिकाणी डोंगराचा भाग कोसळला आहे; मात्र येथील वाहतूक सुरू आहे.गुडाळवाडी येथील नागरिकांनी रात्रीच स्थलांतर केले.