कोल्हापूर : देशामध्ये ब्लड कॅन्सरने लाखो लोक पीडित आहेत. त्यांना दर १५ दिवसांनी रक्ताची गरज असते. त्यासाठी खाटांगळे (ता. करवीर) येथील रघुनाथ प्रभाकर पाटील या ध्येयवेड्या व्यक्तीने अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी १६६ वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. आतापर्यंत त्यांनी ५७ वेळा रक्तदान केले आहे. रघुनाथ पाटील यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच व्यायाम व कुस्तीची आवड असल्यामुळे ते गावातील तालमीमध्ये सराव करायचे. सांगरूळ, कुडित्रे, इचलकरंजी येथे झालेल्या कुस्ती व बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लग्न झाले. सध्या त्यांना दोन मुले आहेत. शेती व्यवसाय सांभाळत आपल्या बलशाली शरीराचा देशासाठी उपयोग करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये आला. त्यासाठी त्यांनी रक्तदानाचा मार्ग स्वीकारला. वर्षातून चार वेळा रक्तदान करण्याचा संकल्प करून रघुनाथ यांनी त्याप्रमाणे रक्तदान केले आहे, त्यांचा हा संकल्प स्तुत्य आहे. (प्रतिनिधी) नेत्रदानाचाही संकल्प--फक्त रक्तदानावरच न थांबता सीपीआर रुग्णालयामार्फत नेत्रदान करण्याचाही संकल्प रघुनाथ पाटील यांनी केला आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या रघुनाथ यांचा हा संकल्प कौतुकास्पद आहे.वयाच्या ४० व्या वर्षांपर्यंत मी ५७ वेळा रक्तदान केले आहे. १६६ वेळा रक्तदान करून रेकॉर्ड करण्याचा माझा विचार आहे. - रघुनाथ पाटील, रक्तदाता
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ५७ वेळा रक्तदान
By admin | Published: October 04, 2015 11:24 PM