कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारीही उघडझाप राहून काही काळ शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊनही पडले. जिल्ह्यातील नद्या अजून तुडूंब भरल्या असल्याने अद्याप ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.
राधानगरी धरणातील दोन दरवाजांतून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा येथे दुपारपर्यंत ३७.०८ इतकी राहिली. शिवाजी पुलावरून कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदच आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर तीन दिवसांपासून कमी झाला आहे. सोमवारी पावसाची उघड-झाप होऊन अधून- मधून हलक्या सरी कोसळत होत्या. शहरासह जिल्ह्यातही काही काळ सूर्यदर्शन झाले. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नद्या तुडूंब भरल्याने अद्यापही ५७ बंधारे पाण्याखाली आहेत.
राज्यमार्ग ४, प्रमुख जिल्हा ७, ग्रामीण १६ व इतर जिल्हा १९ असे ४६ मार्ग बंद असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी इंचा-इंचाने कमी होत असली तरी अद्यापही ती राजाराम बंधारा येथे दुपारी ३७.०८ फुटांवर राहिली. पंचगंगा इशारा पातळीच्या खाली गेल्याने दोन दिवसांपासून शिवाजी पूल येथून बंद करण्यात कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला; परंतु अद्याप चारचाकी व अवजड वाहनांसाठी तो सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले असून त्यामधून ४४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सोमवारी सकाळी आठपर्यंत १४.६८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक गगनबावड्यामध्ये ४५.५० मि.मी., त्याखालोखाल शाहूवाडीमध्ये ३१.०० मि.मी. पाऊस पडला आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा -हातकणंगले (२.१२), शिरोळ (०.५७), पन्हाळा (१२.२९), शाहूवाडी (२६.३३), राधानगरी (२४.५०), गगनबावडा (३०.००), करवीर (७.६३), कागल (७.१४), गडहिंग्लज (६.००), भुदरगड (२३.८०), आजरा (१६.००), चंदगड (१९.८३).
दूधगंगा, कोयनेतून विसर्ग वाढविलादूधगंगा धरण ८८ टक्के भरले असून येथून ८००० क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरण ८४ टक्के भरले असून येथून ६,०६१ क्युसेक, कोयना ७९ टक्के भरले असून ३२ हजार ८०९ क्युसेक, अलमट्टी ८७.८९ भरले असून १ लाख ६५ हजार ६५८ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दूधगंगा व कोयना धरणांतून जलविसर्ग वाढविण्यात आला आहे.