कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी दिवसभरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून प्रतिसेंकद १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदी ३३ फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी धुवाधार पाऊस झाला. दिवसभर अक्षरशा झोडपून काढल्याने एका दिवसात सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. शुक्रवारी सकाळपासून उघडझाप सुरू राहिली. थोडा वेळ उसंत घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे जोरदार सरी कोसळत राहिल्याने पाणीच पाणी होते.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने राधानगरी धरणातून विसर्ग सुरू आहे. नद्यांच्या पातळीत वाढ होत असून ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.