कोल्हापूर : बिटकॉइनच्या स्वरूपात सुमारे १८० टक्के परताव्याचे आमिष दाखवून एकास ५८ लाख ८ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांत सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आजपर्यंत ही फसवणूक ताराबाई पार्कमधील सौदामिनी अपार्टमेंट येथे झाल्याची तक्रार शीतल सुरेश वणकुंद्रे (वय ४९ रा. हरीपुजापुरम, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांनी पोलिसांत दिली.
गुन्हा नोंद झालेल्यांची नावे अशी : केदार नारायण रानडे (रा. विश्वाथ हौसिंग सोसायटी, टाकाळा), पद्मनाभ उर्फ पँडी मधुकर वैद्य (रा. सारसनगर सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था शुक्रवार पेठ, पुणे), अमित बीर (रा. दिल्ली), कंपनी मालक नवीन पाठक ( रा. दिल्ली), अमित भारद्वारज, अजय भारद्वाज (दोघेही रा. शाहीपूल व्हिलेज, शालीमार बाग, नवी दिल्ली).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शीतल वणकुद्रे हे संगणक प्रशिक्षक आहेत. नागाळा पार्कमधील आदित्य कॉर्नर परिसरात सौदामिनी अपार्टमेंटमध्ये केदार रानडे याने रानडे कन्सल्टंट नावाचे कार्यालय सुरू केले होते. रानडे व त्याच्या सहकाऱ्यांनी शीतल वणकुंद्रे यांना १८० टक्के बिटकॉइनच्या स्वरूपात परताव्याचे आमिष दाखवून गेनबिटकॉइन कंपनीमध्ये क्रिप्टो करन्सीच्या एकूण ५८ लाख ८ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जुलै २०१६ पासून आतापर्यंत वणकुंद्रे यांच्याकडून गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम घेतली; पण त्याचा कोणताही परतावा त्यांना दिला नाही.पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली, आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शाहुपुरी पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी करून शहर पोलीस उपअधीक्षकांच्या परवानगीने शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आणखी कोणाकोणाची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाली, याचा तपास पो. नि. राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले करत आहेत.
जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक होत आहे. अनियंत्रित गुंतवणूक योजना प्रतिबंधक अधिनियम २०१९ अन्वये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे. - मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, कोल्हापूर शहर.