हातकणंगले : तालुक्यातील वारणा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या महापुरात या परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत असून, तालुक्यातील १०,९६४ हेक्टर क्षेत्रापैकी ६,४४६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पीक नुकसानाचे ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे तर उर्वरित पीकक्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात पोहोचले असून, ऑनलाईन डाटा भरण्यामध्ये विलंब होत आहे.
तालुक्यातील ६३ गावांपैकी ३५ गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद असून, वारणा आणि पंचगंगा नदीकाठावरील २८ गावांमध्ये महापूर आणि अतिवृष्टीची नोंद झाली आहे. महापुरात १३,०९९ शेतकऱ्यांच्या १०,९६४ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत आणि बागायत पिकाचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस ६ हजार हेक्टर, सोयाबीन २ हजार हेक्टर, भुईमूग दीड हजार हेक्टर, भात ५०० हेक्टर तर भाजीपाला, फळबाग व इतर पिकांचे ५०० हेक्टर अशाप्रकारे अंदाजे नुकसान क्षेत्र आहे.