कोल्हापूर : जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी, महापूर, परतीचा पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार ७६२ शेतकऱ्यांचे ६ कोटी ९ लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ६३९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सर्वाधिक फटका चंदगड तालुक्यात २३८२ हेक्टरवर नुकसान झाले आहे.यंदा मान्सून वेळेत सुरू झाल्याने खरिपाची उगवण चांगली झाली. त्यानंतर खरीप पिकांना पोषक असाच पाऊस झाल्याने वाढ जोमात झाली. मात्र, यावर्षी तीनवेळा महापूर आला, आठ दिवस अतिवृष्टी झाल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले.
ढगफुटीने शिवारे तुटून गेली. त्यानंतर पिके काढणीस आल्यानंतर परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने हाता-तोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली. गेल्या चार महिन्यांत झालेल्या नुकसानीचा पंचनाम्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. भरपाईसाठी अहवाल तातडीने शासनाकडे पाठविला जाणार आहे.
जिल्ह्यात ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले ६३९१ हेक्टर क्षेत्र आहे. प्रतिहेक्टर ६८०० रुपयांप्रमाणे दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांना ६ कोटी ६ लाख ३१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग, भाजीपाला उत्पादक ९१ शेतकऱ्यांचे २६ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. दोन्ही मिळून ६३९१ हेक्टरवरील पिकांचे ६ कोटी ९ लाख २३ हजारांचे नुकसान झाले आहे.शेतजमीन वाहून जाऊन २३ हेक्टर नुकसानढगफुटीमुळे पन्हाळा तालुक्यात २३ हेक्टर शेतजमीन तुटून गेल्याने २ लाख ८३ हजारांचे नुकसान झाले आहे. प्रतिहेक्टर १२ हजार २०० रुपये अनुदान मिळणार आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान असेतालुका ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान हेक्टर शेतकरी अनुदान लाखात
- करवीर ५६६.८६ ४४६५ ६३.७९
- कागल २८७.६८ २१०५ २१.०५
- राधानगरी ४१०.८३ ४९७८ ५२.९७
- गगनबावडा १०४.०६ १६०३ १७.३६
- पन्हाळा ९४३.२६ ७५१३ ७०.०५
- शाहूवाडी ६३७.३७ १०,०१६ ९९.४७
- हातकणंगले २७४.९८ १३८७ २०.५१
- शिरोळ ५५२.६८ २५४० ३९.३४
- गडहिंग्लज १४५.०१ १३०५ १३.०५
- आजरा ७४.०६ ५८६ ८.८२
- चंदगड २३८२.४० १९,१५७ २०१.७३
- भुदरगड १२.०४ १०७ १.०९