कोल्हापूर , दि. १६ : कोल्हापुर जिल्ह्यात ४३९ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दिवाळी आणि शेतीच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सकाळ पासूनच आपापल्या मतदान केंद्रावर गर्दी केल्यामुळे मतदानाचा वेग वाढत आहे. पन्हाळा तालुक्यातील बोरवडे, कोलोली आणि कोतोली येथे किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. उर्वरित बहुतांशी मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरु असून ग्रामीण भागात महिला आणि युवकांनी रांगा लावून मतदान केले. दुपारपर्यंत ६0 टक्के मतदान झाल्याचे समजते.
उजळाईवाडी येथील मतदान केंद्रावर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी ग्रामविकास राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्नी प्रतिमा पाटील यांच्यासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार के. पी. पाटील यांनी मुदाळ येथे मतदानाचा हक्क बजावला. चिमगाव येथील मतदान केंद्रावर शिवसेना सह संपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी मतदान केले.
पाचगाव, गांधीनगर, उचगाव येथे दुपारपर्र्यत सरासरी ७0 टक्क्याहून अधिक मतदान झाले. पावसामुळे बहुतेक गावांमध्ये कापणी, मळणी आदी शेतीची कामे सुरू आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले आहे. त्यामुळे दुपारपर्र्यत मतदानाचा वेग वाढत आहे. लोकांनी गर्दी केली आहे. गोकूळशिरगाव मध्ये सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. सरनोबत वाडीत ५० टक्के तर उचगाव मध्ये ६७ टक्के मतदान झाले. उजळाईवाडीत दुपारी बारा पर्यत चुरशीने ५0 टक्के मतदान झाले. नेर्लीत चुरशीने मतदान झाले. सकाळी साडे अकरापर्यंत येथील केंद्रावर ५0 टक्के मतदान झाले. पाचगाव येथे ४0 टक्के मतदान झाले. कणेरी वाडीत दोन वाजेपर्यंत शांततेत ७३ टक्के मतदान झाले.
कांडगाव ग्रामपंचायतीसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत ५० टक्के मतदान झाले. राशिवडे येथे दुपारी एक पर्यंत साठ टक्के मतदान झाले. परिसरातील सर्व सहा मतदान केंद्रावर सकाळपासुन रांगा लागल्या होत्या, येथे मतदान शांततेत आणि अत्यंत चुरशीने सुरू आहे. इव्हिएम मशीनमुळे मतदानाला वेळ लागत आहे. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे ६0 टक्के मतदान झाले. हे गाव मतदान आणि निकालासाठी संवेदनशील मानले जाते.
आंबवडे येथे मतदानासाठी महीलांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील जाखले, आंबवडे येथे दुपारपर्यंत ५0 टक्के मतदान पुर्ण झाले. पिंपळेसातवे पन्हाळा येथे तर सकाळीच ९० टक्के मतदान पुर्ण झाले. दुपारी १ वाजेपर्र्यत जुने पारगावात ५८ टक्के तर नवे पारगावात ६१ टक्के मतदान झाले. शाहुवाडी तालुक्यातही उत्साहाने मतदानास सुरुवात झाली. घुंगूर ता. शाहूवाडी येथील १0३ वर्षाच्या चंद्राबाई रामू खोत या आजीला त्यांचा नातू जोतीराम खोत याने पाठीवरुन नेत मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
बोरवडे येथे मतदान खोल्या पूजताना किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. मात्र नंतर उत्साहात मतदान सुरु झाले. बोरवडे येथे दुपारपर्यंत चुरशीने ८0 टक्के मतदान झाले. ९0 टक्के मतदान होण्याची शक्यता, आहे. चुरस असल्यामुळे येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या केंद्रावर आजीला मतदान केंद्रावर नेण्यासाठी दोन गटात बाचाबाची झाली
कागल तालुक्यताील बामणी येथे शांततेत ५0 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झाले. सेनापती कापशीसह परीसरातील ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदारांसह कार्यकर्त्यांची गर्दी केली होती. कसबा सांगाव येथील केंद्रावर महिला मतदारांची गर्दी मोठी होती. कसबा सांगाव येथील केंद्र क्र. ५ वर सकाळी ९.१५. वाजताच मतदारांनी मोठी गर्दी केली होती.पश्चिम महाराष्ट्रात भाजपची धोबीपछाड होणार : सतेज पाटील
उजळाईवाडी येथील मतदान केंद्रावर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी ग्रामविकास राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पत्नी प्रतिमा पाटील यांच्यासोबत आपला मतदानाचा हक्क बजावलाय. मतदान केल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपची धोबीपछाड होणार असून काँग्रेसला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वसामान्य जनतेची फसवणूक भाजपने केली असून जागृत मतदार याचा विचार करून मतदान करेल त्यामुळे काँग्रेसला चांगले यश मिळेल असेही त्यांनी यावेळी भाकीत केले.