कोल्हापूर उत्तरसाठी ईर्ष्येने ६० टक्के मतदान, शनिवारी फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:37 AM2022-04-13T11:37:57+5:302022-04-13T11:38:43+5:30

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लक्षवेधी लढत झाली. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होणार आहे.

60 Percentage votes in Kolhapur North Assembly constituency by election | कोल्हापूर उत्तरसाठी ईर्ष्येने ६० टक्के मतदान, शनिवारी फैसला

छाया : नसीर अत्तार

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत मंगळवारी ईर्षेने आणि तणावपूर्ण वातावरणात सुमारे ६१ टक्के मतदान झाले. मतदानावेळी दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने प्रचंड घोषणाबाजीच्या घटना घडल्या. त्यातून कांही ठिकाणी तणाव निर्माण झाला.
महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात ही लक्षवेधी लढत होत आहे. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होत आहे. या निकालाचा राज्याच्या सत्ताकारणांवर फारसा परिणाम होणार नसला तरी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची एकजूट कितपत सांधली आहे याचा निकाल ही लढत देणार आहे.

या निवडणुकीत रिंगणात पंधरा उमेदवार असले तरी लढत दुरंगीच झाली. प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील विरुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई असेही या लढतीला स्वरुप आले. एकूण २ लाख ९२ हजार मतदार होते. मतदानासाठी ३५७ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठे,शुक्रवार पेठ अशा पेठांपासून ते राजारामपुरी-ताराबाई पार्कचा उच्चभ्रू वसाहती, शाहुपुरी-लक्ष्मीपुरीची व्यापारी वस्ती व गोरगरिब कष्टकरी झोपडपट्टीधारक असे संमिश्र मतदार असलेला हा मतदार संघ आहे. उन्हाचा तडाखा असूनही लोक मतदानासाठी बाहेर पडले.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही निवडणूक लागली. सुरुवातीच्या टप्प्यात ती बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले परंतू आगामी महापालिका निवडणूक व महाविकास आघाडीच्या कारभाराविरुध्दचा जनमताचा कौल अजमावण्यासाठी भाजपने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसेना सुरुवातीला नाराज झाली. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या मतांवरच शेवटपर्यंत डोळा ठेवून निवडणूक लढवली.

आणखी काय हवं...

भाजपने राज्यभरातून नेते, कार्यकर्ते प्रचारात उतरवले. शिवसेनेचेही मुंबई-पुण्याचे नगरसेवक प्रचारात होते. दोन्ही बाजूंकडून पैशांचे वाटप, जेवणावळीपासून किराणा दुकानांतून घरपोहोच माल पुरवण्यापर्यंत सर्व प्रकारची यंत्रणा राबवली.

एवढी चुरस कशामुळे..

ज्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांनी पेटीएमद्वारे एक हजार स्वीकारल्यास ईडीची धमकी मतदारांना दाखवली, त्यांच्याच पक्षाचे सहा प्रमुख कार्यकर्ते मतदारांना पैसे देताना आदल्या दिवशी पोलिसांनी पकडले. कांहीही झाले तरी ही लढत जिंकायचीच या ईर्षेनेच ही लढत झाल्याने या एका मतदार संघाच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले.

हिंदुत्वाचा पुकारा...

भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भगव्या टोप्या घालून मतदान केंद्रापर्यंत जयश्रीराम..च्या घोषणा दिल्या. त्याला शिव-शाहूंच्या विचारधारेच्या कोल्हापूरकरांनी मतपेटीतून काय उत्तर दिले यावरच याचा निकाल ठरणार आहे. भाजपची आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची राजकीय दिशा काय असेल याचीच चुणुक या लढतीने दाखवली आहे.

वेळ व झालेले मतदान आकडेवारी

वेळ : टक्केवारी सकाळी ७ ते ९ : ६. ९६ टक्के
सकाळी ९ ते ११ : २०. ५७ टक्के
सकाळी ११ ते दुपारी १ : ३४.१८ टक्के
दुपारी १ ते ३ : ५५.२६ टक्के
सायंकाळी ६ वाजेपर्यंत : ६०.०९ टक्के (अंदाजे)

Web Title: 60 Percentage votes in Kolhapur North Assembly constituency by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.