समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून गेल्या ११ महिन्यांत जिल्ह्यातील ५९ हजार ८०२ रुग्णांनी फायदा घेतला आहे. तर साडेसात हजार रुग्णांनी या दवाखान्यातील लॅबच्या माध्यमातून रक्त, लघवीसह अन्य तपासण्या मोफत करून घेतल्या आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही आपला दवाखाना योजना जाहीर केली होती. त्यानुसार मोठ्या शहरांमध्ये हे दवाखाने सुरू करण्यात आले. या प्रत्येक दवाखान्यात डॉक्टर, नर्ससह उपलब्ध आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात भाड्याच्या संबंधित संस्थांच्या किंवा तशी जागा न मिळाल्यास भाड्याच्या जागेत हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. याच ठिकाणी रक्त, लघवीचीही तपासणी करून अहवाल देण्यात येतात. ही सर्व सेवा मोफत आणि नागरिकांना त्यांच्याच परिसरात मिळत असल्याने साहजिकच याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आसरा नगर इचलकरंजी, लाखे नगर गडहिंग्लज, तुकाराम हॉल मुरगूड, जुनी पंचायत समिती सभागृह पन्हाळा, मलकापूर, कुरूंदवाड, भादवण, रामदेव गल्ली चंदगड, पितळी गणपती चौक कोल्हापूर, कळंबा जेल परिसर, रायगड कॉलनी, यादव नगर, गैबी चौक कागल, क्रांतीसिंह नाना पाटील नगर या ठिकाणी हे दवाखाने कार्यरत आहेत.
कोल्हापूर शहरात आणखी ८ दवाखाने होणारकोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर झोपडपट्टी, जागृतीनगर झोपडपट्टी, शुगर मिल परिसर, लोणार वसाहत, जवाहर नगर, कनान नगर, ब्रम्हपुरी परिसर, जिवबा नाना पार्क या ठिकाणी आठ असे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहेत. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच जानेवारी २०२५ अखेर हे दवाखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एचएचसीसी कंपनीकडे व्यवस्थापनया नवीन दवाखान्यांचे व्यवस्थापन एचएचसीसी इंडिया लि. कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्येक दवाखान्यात मनुष्यबळासह सर्व यंत्रणा या कंपनीकडून उभारण्यात येणार आहे. ५०० फुटांच्या जागेमध्ये स्वतंत्र टॉयलेट, बाथरूमची व्यवस्था असावी यादृष्टीने जागा भाड्याने घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापुढच्या काळात याच ठिकाणी आठवड्यातून एक दिवस बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, त्वचा, कान-नाक-घसा तज्ज्ञ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.