लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेंडा पार्कात तीन महिन्यापूर्वी आगीत होरपळलेल्या रोपांवर गेल्या तीन दिवसापासून टॅंकरद्वारे रोज साठ हजार रुपये खर्चून पाण्याची फुंकर मारली जात आहे, पण त्याचे प्रमाण आणि होणारा खर्च पाहता हे नेमके कोणाला जगवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत असून वनविभागाच्या एकूण कारभाराविषयी शंका घेतली जात आहे.
शेंडा पार्कात वन विभागाने शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जून २०१८ मध्ये ३० हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड केली. ऑक्सिजन पार्क करण्याच्या हेतूने वड पिंपळासह करंज, चिंच, लिंब, फणस, आवळा, आपटा, बहावा, उंबर, कोकम, कदंब, बकूळ या औषधी दुर्मिळ वृक्षांची लागवड झाली. दोन वर्षे देखभाल झाल्याने बहुतांश झाडे दोन तीन फुटावर वाढली होती, पण त्यानंतर कोरोनामुळे देखभालीचा खर्च मिळत नसल्याचे कारण पुढे करत वनविभागाने लक्ष काढून घेतले. या दुर्लक्षामुळे डिसेंबरमध्ये भीषण आग लागून एक लाखांपैकी ८० हजाराहून अधिक झाडे जळाली. सुदैवाने अवकाळी पाऊस झाल्याने यातील बऱ्याच झाडांना पालवी फुटली. दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेत टॅंकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली, पण झाडांची संख्या आणि लागणारे पाणी याचे गणित न जमल्याने हा उपक्रम आठवडाभरातच बंद पडला. तेव्हापासून ही झाडे पाण्याविना होरपळत होती.
पाण्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसापासून पाणी घातले जात आहे. अडीच महिन्यापासून पाणी नसल्याने रोपे कोमेजली आहेत. काही रोपांचे सांगाडे उभे आहेत. जमीनही भेगाळली आहे. त्यामुळे १०० लिटर जरी पाणी एका झाडाला ओतले तरी ते पुरणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. तरी देखील वन विभागाने ३१ मार्चपर्यंत मंजूर केलेल्या टेंडरनुसार सध्या वीटा ( जि. सांगली) येथील ठेकेदाराकडून हे काम करवून घेतले जात आहे. पाचगावमधूनच ८ हजार रुपयांना एक याप्रमाणे टॅंकर असे पाणी विकत घेऊन रोज सहा ते सात टॅंकरने या झाडांना पाणी दिले जात आहे. झाडाभाेवती ना अळे, ना मातीची भर ना कोणते खत. केवळ पाणी टाकण्याची औपचारिकता वनविभागाकडून पूर्ण केली जात आहे. दिले जाणारे पाणी देखील पुरेसे नसल्याने या रोपांचे भवितव्य आता निसर्गाच्या हातात आहे.
चौकट ०१
सरकारी नियम एका झाडाला १७ लिटर पाण्याचा आहे. पण सध्या त्याच्या निम्मेच पाणी दिले जात आहे. तीन मिनी टॅंकर, सहा मजुरांकरवी सकाळी आठ ते संध्याकाळी ६ यावेळेत पाणी देण्याचे काम करत आहेत. या सर्वावर रोजचा ६० हजाराचा खर्च होत आहे. मे महिन्यापर्यंत पाणी द्यावे लागणार असल्याने यासाठी किमान १०० दिवसाचा कालावधी धरला तर ७० लाखांचा निधी यासाठी खर्ची पडणार आहे. पाणी किती आणि कसे दिले जात आहे, याकडेही वन विभागाचे लक्ष नाही.
१८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०३
शेंडा पार्कातील शतकोटी वृक्ष लागवडीची अशी अवस्था झाली आहे.
१८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०४
शेंडा पार्कातील होरपळणाऱ्या वृक्षांना टॅंकरद्वारे पाणी दिले जात आहे.
१८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०५
वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेंडा पार्कातील हे प्रस्तावित ऑक्सिजन पार्क असे भकास झाले आहे.
(सर्व छाया: नसीर अत्तार)