लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी मंजूर असताना प्रत्यक्षात २० ठिकाणी केवळ एकच डॉक्टर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विविध संवर्गातील ६०९ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने इतरांवर कामाचा भार वाढला आहे. यासाठी शासनाने तातडीने भरती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात ७६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून त्यासाठी एकूण १२८९ आरोग्य कर्मचारी मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ७०१ कर्मचारी कार्यरत असून ६०९ जागा रिक्त आहेत. एकूण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १७३ जागा मंजूर असून त्यापैकी १२६ जागा भरल्या असून अजूनही ४७ जागा रिक्त आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असतो. परंतु तेवढे अधिकारीच उपलब्ध नसल्याने २० केंद्रांवर एकच वैद्यकीय अधिकारी नेमण्यात आला आहे.
केवळ येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे आणि त्यांना औषधे देणे एवढेच काम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करत नाहीत, तर केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या विविध योजना, सर्वेक्षणे यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यांवर असते. त्यामुळे साहजिकच आहे, त्या वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे ७६
एकूण मंजूर कर्मचारी १२८९
कार्यरत कर्मचारी ७०१
रिक्त जागा ६०९
चौकट
तालुकावर रिक्त पदे
आजरा २३
भुदरगड ३६
चंदगड ४६
गडहिंग्लज ४०
गगनबावडा १०
कागल ३६
करवीर ४६
पन्हाळा ५३
राधानगरी ३०
शाहुवाडी ४७
हातकणंगले ७१
शिरोळ ५५
मुख्यालय १६२
एकूण ६५५
चौकट
जिल्ह्यामध्ये ४१४ उपकेंद्रे कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत या ठिकाणी आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा मोठा दिलासा ग्रामीण भागाला मिळाला आहे.
कोट
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे मोठया संख्येने जागा रिक्त आहेत. मात्र महिन्याच्या १ आणि १५ तारखेला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती डॉक्टरांच्या मुलाखती घेत असते. ११ महिन्यांसाठी डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या जातात. उर्वरित जागा भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
- डॉ. योगेश साळी
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर