सांगली : अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ४१०० टन बेदाणा भिजला. तो काळा पडल्यामुळे शेतकऱ्यांचे ६१ कोटी ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. सलग दुसऱ्यावर्षी बेदाणा उत्पादकांचे नुकसान होऊनही याकडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे बेदाणा उत्पादक चिंतेत आहे. सध्या ढगाळ हवामान असून, आणखी पाऊस पडल्यास शेतकरी अस्मानी संकटात सापडणार आहे.जिल्ह्यात एक लाख एकरवर द्राक्षबागांचे क्षेत्र असून, त्यापैकी ६० टक्के द्राक्षाचा बेदाणा तयार होता. द्राक्षबागायतदारांनी सांगोला तालुक्यातील जुनोनी, कोळे या परिसरासह जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातही बेदाणा तयार केला आहे. या सर्वच परिसराला अवकाळी पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले. बेदाणा रॅकमध्ये पाणीच पाणी साचून राहिल्यामुळे तो पूर्ण काळा पडला आहे. दोन दिवस असेच ढगाळ हवामान राहिल्यास बेदाणा शेतकऱ्यांच्या हाती लागणार नसल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात सात ते आठ हजार टन बेदाणा काळा पडल्याचा बेदाणा उत्पादकांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रभारी जिल्हाधिकारी सतीश लोखंडे यांनी प्रशासनाने तातडीने कृषी विभाग आणि तहसीलदारांकडून बेदाण्याच्या नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे. जत तालुक्यात १४०० टन, कवठेमहांकाळ तालुक्यात २५०० टन आणि तासगाव तालुक्यात २०० टन बेदाणा भिजल्यामुळे तो काळा पडल्याचे सांगितले. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार ४१०० टन बेदाण्याचे ६१ कोटी ५० लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
अवकाळीने बेदाणा उत्पादकांना ६१ कोटींचा फटका
By admin | Published: March 02, 2015 11:54 PM