कोल्हापूर : महापालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त असलेली वर्ग- चारमधून वर्ग- तीनमध्ये म्हणजे लिपिक पदाची पदोन्नती प्रक्रिया शुक्रवारी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेने पूर्ण झाली. वर्ग- तीनमधील मुकादम व मुकादम तथा लिपिक, झाडू कामगार, सफाई कामगार, पवडी कामगार, पहारेकरी व शिपाई या वर्ग- चारमधील ६२ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली.गेल्या १३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध संवर्गातील पदोन्नतीबाबत महापालिका कर्मचारी संघाने वारंवार पाठपुरावा केला होता. पदोन्नतीसह काही मागण्यांकरिता संपाचा इशाराही दिला होता. दिवाळीच्या तोंडावर संप नको, म्हणून प्रशासकांनी निर्णय घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संघाने संपाची नोटीस मागे घेतली.चार मुकादम व मुकादम तथा लिपिक, १४ झाडू व सफाई कामगार, १७ पवडी कामगार, ११ पहारेकरी, १६ शिपाई यांना आता कनिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांत पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. यापुढे संवर्गनिहाय अद्याप रिक्त असलेल्या पदांबाबत आढावा घेऊन दोन महिन्यांनतर पुन्हा पदोन्नती समितीची बैठक घेऊन रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याबाबत प्रशासकांनी आश्वासित केले आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना सहा हजार तर रोजंदारी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये तसलमात देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दि. १ जानेवारी ते ३० जून २०२३ या कालावधीत वाढ झालेला चार टक्के महागाई भत्त्याचा फरकही आर्थिक उपलब्धतेनुसार संवर्गनिहाय अदा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या कामात अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर,सहायक आयुक्त संजय सरनाईक, आस्थापना अधीक्षक राम काटकर, रवका अधिकारी प्रशांत पंडत, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोल्हापूर महापालिकेची ६३ कामगारांना दिवाळी भेट; सफाई, झाडू कामगार, शिपाई झाले लिपिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 1:46 PM