कोल्हापूर : जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गुरुवारी ६५ कर्मचारी कामावर हजर झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाला गुरुवारी एक महिना पूर्ण झाला असून, अजूनही कोणताच तोडगा न निघाल्याने या कर्मचारी कामावर रुजू झाल्या आहेत.‘मानधन नको, वेतन हवे’ यासह अन्य मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चारही संघटनांनी गेल्या महिन्याभरात वेळाेवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली आहेत. मुंबई येथे या प्रश्नी झालेल्या बैठकीतही काही तोडगा निघाला नाही, तर नागपूर येथे विधानसभा अधिवेशनावेळीही मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. परंतु, तरीही निर्णय झाला नाही. अखेर बुधवार, ३ डिसेंबरपासून मुंबईत आझाद मैदानावर या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
मात्र, हे आंदोलन सुरू होऊन एक महिना झाल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच नव्याने नेमणूक झालेल्या सेविका आणि मदतनिसांना प्रशासनाने कामावर हजर होण्याचे आवाहन केल्यामुळे जिल्ह्यात गुरुवारी ५५ मदतनीस आणि १० सेविका कामावर हजर झाल्या आहेत. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील प्रमाण अधिक असून, त्याखालोखाल करवीर आणि कागल तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारवाईमुळे भीतीसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नव्याने हजर झालेल्या ४० हून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला. त्यांच्याऐवजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची कुणकुण लागल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील नव्याने नेमण्यात आलेल्या कर्मचारीही कामावर रुजू होत आहेत. मात्र, अशा पद्धतीने संपात सहभागी होण्याचा या कर्मचाऱ्यांचा अधिकार शासन हिरावून घेऊ शकत नाही, असे संघटनांचे म्हणणे आहे.