कोल्हापूर : जनता बझार, राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरणाच्या खर्चाची खोटी कागदपत्रे तयार करून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणामध्ये निष्पन्न झाले. या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापकासह नऊजणांविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. यामध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व प्रकाश बोंद्रे यांच्यासह आठ संचालकांचा समावेश आहे. या अपहार प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संस्थेचे अध्यक्ष उदय ऊर्फ उद्धव रा. पोवार (रा. शुक्रवार पेठ), संचालक प्रल्हाद भाऊसाहेब चव्हाण (रा. शिवाजी पेठ), प्रकाश परशराम बोंद्रे (शिवाजी पेठ), तानाजी धोंडिराम साजणीकर (रा. हनुमाननगर, उजळाईवाडी), अरुण यशवंत साळोखे (रा. आपटेनगर), शिवाजी बा. घाटगे (रा. शिवाजी पेठ), नीरज कैलास जाजू (रा. नागाळा पार्क), कात्यायनी मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन मधुकर लक्ष्मण शिंदे (रा. निकम गल्ली, कळंबा), व्यवस्थापक आनंदराव बा. फडतरे (रा. भुये, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. संचालक शामराव महादेव शिंदे (रा. शुक्रवार पेठ) यांचेही नाव गुन्ह्णात आहे; परंतु निधन झाल्याने त्यांना या गुन्ह्णातून वगळले आहे. पोलिसांनी सांगितले, विशेष लेखापरीक्षक वर्ग २ चे विष्णू गणपती कदम यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार जनता बझार राजारामपुरी, वरुणतीर्थ येथील देशभक्त रत्नापाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स या संस्थेचे लेखापरीक्षण दि. १७ जून २०१५ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत पूर्ण केले. यावेळी संस्थेच्या जनता बझार राजारामपुरी, वरुणतीर्थ या शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण केल्याचे दाखवून लक्ष्मीपुरीतील मुख्य शाखेच्या किर्दीमध्ये रकमा खर्ची टाकून ६४ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अपहाराची लेखी माहिती त्यांनी २७ जानेवारी २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांना दिली. त्यांनी या प्रकरणी १७ फेब्रुवारीला पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश कदम यांना दिले. त्यानुसार रविवारी त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. असा झाला उलगडा संस्थेने अथर्व मार्केटिंगचे नीरज जाजू व नितीन जाजू यांना जनता बझार राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखा २० वर्षे मुदतीच्या कराराने चालविण्यास दिल्या आहेत. संस्थेने ८ फेब्रुवारी २०१४ पासून जाजू यांना संचालक म्हणून घेतले. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी अथर्व मार्केटिंग यांच्याशी नवीन करार केला. त्यामध्ये संस्थेच्या नूतनीकरण व सुशोभीकरणाचा खर्च अथर्व मार्केटिंगने करावयाचा असल्याचा ठराव आहे. यासंबंधी लेखापरीक्षक कदम यांनी अथर्व मार्केटिंगच्या नीरज व नितीन जाजू यांना खर्चासंबंधी विचारणा केली असता त्यांनी कंपनीतर्फे जनता बझार राजारामपुरी व वरुणतीर्थ या दोन्ही शाखांचे नूतनीकरण व सुशोभीकरण केल्याचा अहवाल दिला; तर संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी संस्थेने खर्च केल्याचा अहवाल दिला. दोन्ही अहवाल विसंगत आल्याने अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी १० मे २०१२ रोजी सभेतील ठरावानुसार समिती स्थापन करून व पाच सभा घेतल्याचे भासवून बांधकाम समिती, कात्यायनी मजूर सहकारी संस्था व रेवणसिद्ध मजूर सहकारी संस्थेशी संगनमत करून अपहार केला आहे. बंद संस्थेत ‘अर्थ’ जनता बझार बंद पडून पंधरा वर्षांपासून अधिक काळ झाला. या संस्थेवर हे संचालक केवळ नामधारी होते. तरीही त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला.
जनता बझारमध्ये ६५ लाखांचा अपहार
By admin | Published: February 20, 2017 12:51 AM