कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून सुमारे ६५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज उचलून अॅक्सिस बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सराफ शरद लक्ष्मण नागवेकर (रा. ब्रह्मेश्वर बाग, शिवाजी पेठ) याच्यासह १३ ग्राहकांवर मंगळवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सांगितले, राजारामपुरी येथील साईक्स एक्स्टेंशनमध्ये अॅक्सिस बँकेची शाखा आहे. या बँकेच्यावतीने रघुनाथ एस. दिंडोरकर अँड सन्सतर्फे सराफ शरद लक्ष्मण नागवेकर यांना सोने तपासणीचे अधिकार दिले आहेत. नागवेकर याने २०१३ ते फेब्रुवारी २०१५ पर्यंत बँकेत १३ ग्राहकांकडून बनावट सोने घेऊन ते खरे असल्याचे दाखवून त्यांना प्रमाणपत्र दिले. त्याआधारे त्यानी बँकेकडून ६५ लाख ५० हजार रुपये कर्ज उचलले. मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या व्यवहाराची तपासणी करताना त्यामध्ये बनावट सोने आढळून आले. यामुळे बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँक व्यवस्थापक घनशाम मोहनलाल चांडक (वय ३४, रा. न्यू पॅलेस) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित सराफ शरद नागवेकर, ग्राहक आशा अशोक दारेकर, माणिक नामदेव मोहिते, हंबीरराव विष्णू सुर्वे, अंजना जगन्नाथ रकटे, नितीन दिलीप वंशे, संतोष बापू गोंधळी, रमेश जयसिंग जाधव, नीता रवींद्र जाधव, छाया किसन वासुदेव, अमोल विजय गवळी, सुमन सखाराम चौगले, सुमन श्रीकांत डांगे, बाबासाहेब दत्तात्रय पाटील, आदींच्या विरोधात फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत. (प्रतिनिधी)
बनावट सोने तारण ठेवून बँकेला ६५ लाखांचा गंडा
By admin | Published: April 15, 2015 12:46 AM