राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांत यावेळेला तब्बल ६५ अपक्षांनी आपले नशीब अजमावले. त्यापैकी ‘चंदगड’ मधून शिवाजी पाटील हे जाएंट किलर ठरले. त्यांच्यासह सर्वांनी २ लाख ४६ हजार ४३१ मते घेतली. त्याचबरोबर नाव व चिन्हातील साम्य असणाऱ्या अपक्षांनी घेतलेली मते लक्षवेधी आहेत.प्रत्येक निवडणुकीत अपक्षांचे गणित वेगवेगळे असते. राजकीय पक्षाने उमेदवारी न दिल्याने काहीजण रिंगणात उतरतात, तर काहींना पक्षीय उमेदवारांचे गणित बिघडवण्यासाठी मैदानात उतरवले जाते. यावेळेला ६५ अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी शिवाजी पाटील यांना यश आले. ‘कोल्हापूर उत्तर’ मधून अपक्ष, पण नंतर काँग्रेसने पुरस्कृत केलेले राजेश लाटकर यांनी ८० हजार ८०१ मते घेतली. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील, माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांना अपेक्षित मतेही घेता आली नाहीत.
‘के. पी.’ यांच्या भेंडीला १,१४५ मतेराधानगरी मतदारसंघात उद्धव सेनेचे माजी आमदार के. पी. पाटील हे रिंगणात होते. त्यांच्या नावाचे साम्य असलेले के. पी. पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे उद्धव सेनेच्या ‘मशाल’ प्रमाणेच दिसणारी ‘भेंडी’ हे त्यांचे चिन्ह होते, त्यांना १,१४५ मते मिळाली.
‘शाहूवाडी’करांना ‘विनय’, ‘सत्यजित’ नावाचा चकमा‘शाहूवाडी’मध्ये जनसुराज्यचे विनय कोरे व उद्धव सेनेचे सत्यजित पाटील यांच्यात लढत झाली. येथे विनय कोरगावकर, विनय चव्हाण, सत्यजित बालासाो पाटील व सत्यजित विलासराव पाटील हे चार उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे विनय चव्हाण यांचा ‘झोपाळा’ हा कोरे यांच्या ‘नारळाची बाग’ तर सत्यजित बालासाो पाटील यांची ‘चिमणी’ व सत्यजित विलास पाटील यांचा ‘गळ्यातील टाय’ हे चिन्ह ‘मशाल’ सारखे दिसत होते. येथे चौघांनी ३००९ मते घेतली.
‘ट्रम्पेट’ने घेतली इचलकरंजी, कागलात मतेइचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे होते. त्याला साम्य असे ‘ट्रम्पेट’ चिन्ह सचिन आठवले यांचे होते, त्यांना २,१३३ मते मिळाली. तर, मदन कारंडे म्हणून दुसरे अपक्ष हाेते, त्यांना २३७ मते मिळाली. कागलमध्ये सत्ताप्पा कांबळे यांच्या ‘ट्रम्पेट’ २,३१९ मते घेतली.
मतदारसंघनिहाय अपक्षांनी अशी घेतली मते मतदारसंघ - अपक्ष - मते
- चंदगड - ११ - १,१४,५८० (शिवाजी पाटील यांच्यासह)
- राधानगरी - ०३ - १९,१०५
- कोल्हापूर दक्षिण - ०५ - १,१२९
- कागल - ०६ - ३,८४४
- करवीर - ०५ - ८५१
- कोल्हापूर उत्तर - ०८ - ८३,१३३ (राजेश लाटकर यांच्यासह)
- शाहूवाडी - ०७ - ४,७२७
- हातकणंगले - १० - ९,३७०
- इचलकरंजी - ०५ - ५,३३५
- शिरोळ - ०५ - ३,०६३