कोल्हापूर : पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणच्या नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही मार्गांवर नदीचे पाणी आल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाला रविवारी ६५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. काही मार्ग पूर्णपणे बंद केले असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गावर वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर खोकुर्ले, मांडुकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या एसटी रद्द केल्या.रंकाळा बसस्थानकातून मानबेटकडे धावणारी एसटी पुलावर पाणी आल्याने अंशत: बंद आहे. ऐनापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने गडहिंग्लज आगारातून कोवाडपर्यंत धावणारी एसटी अंशत: बंद आहे. गारगोटी ते मुरगुड मार्ग आणि चंदगड ते पारगड मार्ग बंद आहे. कागल ते मुरगुड मार्ग बंद असून, भडगाव पुलावर पाणी आल्याने आजरा ते साळगावपर्यंत पूर्ण वाहतूक बंद आहे.
७५ हजार ६४४ रुपयांचे उत्पन्न बुडालेएसटीच्या संभाजीनगर आगाराच्या २६, गडहिंग्लजच्या ६, मलकापूर ४, चंदगड २५ आणि आजरा आगारातून ४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील दिवसभराचा २ हजार ४८६ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला, तसेच ७५ हजार ६४४ रुपयांचे उत्पन्न बुडाले.