भीमगोंडा देसाई--कोल्हापूर -जिल्ह्यातील ६८ प्राथमिक शाळा भारतीय मानांकन संस्थेच्या ‘आयएसओ’ प्रमाणाच्या शर्यतीमध्ये सहभागी होणार आहेत. सहभागी शाळांचे मूल्यांकन खासगी संस्थेतर्फे ४३ निकषांवर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकाधिक शाळा आयएसओ प्रमाणित व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व निकष पूर्ण करण्यासाठी सहभागी शाळांची धडपड सुरू आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळाल्यास शासकीय शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षण प्रशासनाचा वाटतो.खासगी शिक्षण संस्थांची संख्या वाढते आहे. इंग्रजीमध्ये शिक्षण देण्याकडे पालकांचा कल आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटते आहे. सामान्य, गरिबांची मुले शासकीय शाळेत आणि श्रीमंतांची मुले खासगी शाळेत असे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आपल्या शाळेत पटसंख्या वाढविणे, गुणवत्ता वाढावी याकडे विशेष लक्ष, सेवा-सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे शासकीय शाळांमध्येही पटसंख्या वाढते आहे. खासगी शाळांच्या तुलनेत आम्हीही कमी नाही, हे सिद्ध करण्यासाठी ६८ प्राथमिक शाळा ‘आयएसओ’च्या स्पर्धेत उतरल्या आहेत. या शाळांची तपासणी केंद्र सरकार पुरस्कृत ‘विमजीट’ कंपनीकडून होणार आहे. जुने रेकॉर्ड, गुणवत्ता, सौरऊर्जा व गांडूळ खत प्रकल्प, ई-लर्निंग, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सेवा, सुविधा अशा ४३ निकषांवर शाळांची तपासणी होईल. सर्व निकष पूर्ण केलेल्या शाळांना ही कंपनी ‘आयएसओ ९००१२००८’ हे प्रमाणपत्र देईल. सातत्य आहे किंवा नाही, या पाहणी करण्यासाठी मानांकन प्राप्त शाळांची सलग तीन वर्षे तपासणी केली जाणार आहे. आयएसओप्राप्त शाळा दर्जेदार सेवा आणि गुणवत्तेचे प्रतीक समजले जाते. त्यामुळे सहभागी शाळा लोकवर्गणीतून सर्व निकष पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांचेही त्यांना पाठबळ मिळत आहे. सर्वाधिक शाळा कागल तालुक्यात...शाळांची तालुकानिहाय नावे : आजरा - मडिलगे, पेरणोली, करपेवाडी, हरपवडे, देवर्डे, सरोळी. राधानगरी - अर्जुनवाडा, कन्या राधानगरी, कुमार राधानगरी, कपिलेश्वर, तारळे खुर्द, चांदे, फेजिवडे, दिघेवाडी. पन्हाळा - भैरेवाडी, मगदूम वसाहत मोहरे, कोतोली माळवाडी, पिसात्री, पडळ. गडहिंग्लज - ऐनापूर, खमलेट्टी, तेरणी, वडरगे. शिरोळ - धरणगुत्ती, ऊर्दु अकिवाट, केंद्रशाळा शेडशाळ. शाहूवाडी - सांबू, सावे, बांबवडे, येळाणे, चनवाड. कागल - केनवडे, व्हन्नूर, गलगले, अर्जुनवाडा, कासारी, सोनाळी, बिद्री, फराकटेवाडी, मळगे बुद्रुक . गगनबावडा - निवडे, अणदूर, ठाकरवाडी, लोंघे, धुंदवडे. करवीर - देवाळे, बेले, वाकरे, शिये हनुमाननगर, कावणे, गडमुडशिंगी. चंदगड - निट्टूर, किणी, माणगाव, मजरे कार्वे, कालकुंद्री. हातकणंगले - नीलेवाडी, मिणचे, कुमार इंगळी, रांगोळी - खोची, रेंदाळ. भुदरगड - गंगापूर, कूर, वेसर्डे, पिंपळगाव, खानापूर, मडूर, पाटगाव.जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ६८ प्राथमिक शाळा आयएसओ मानांकनासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात या शाळांची तपासणी होईल. अधिकाधिक शाळा आयएसओ मानांकित व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहे.- सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी
६८ शाळा ‘आयएसओ’च्या शर्यतीत
By admin | Published: December 25, 2015 11:33 PM