कोल्हापूर : कोरोनामुळे अनाथ झालेल्या जिल्ह्यातील ६८८ बालकांना सन २०२२-२३ या चालू शैक्षणिक खर्चासाठी दहा हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कोविड टास्क फोर्सने हा निर्णय घेतला असून, नुकतीच या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. कोरोनाने ज्यांच्या पालकांचे (आई किंवा वडील किंवा दोघेही) निधन झाले अशा विद्यार्थी, पालक किंवा जवळच्या नातेवाइकांनी या योजनेसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास विभागाने केले आहे.कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालकांच्या निधनामुळे अनाथपण आलेल्या १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी एकरकमी दहा हजारांचा निधी द्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २० ऑक्टोबर २०२१ साली दिला होता. त्यासाठी २५ कोटी ५३ लाख २५ हजार ५४८ इतका निधी राज्याच्या बालन्याय निधीमध्ये उपलब्ध करून दिला असून, त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७५ लाखांचा निधी मिळाला आहे.
या निधीसाठी लाभार्थींनी अर्ज करावेत यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाने आवाहन केले होते. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांची शहानिशा करून नुकताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत ६८८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील आणखी २९५ लाभार्थींना याचा लाभ मिळू शकतो.
- कोरोनाने अनाथ झालेली एकूण बालके : १ हजार १८१
- निधी मंजूर झालेली बालके : ६८८
- निकषात न बसणारी बालके : १९८
ही कागदपत्रे आवश्यक
- कोरोनाने मृत्यू झालेल्या पालकाचा मृत्यू दाखला
- विद्यार्थ्याचा शाळेचा दाखला
- कोणत्या शैक्षणिक कारणासाठी निधी हवा आहे त्याची कागदपत्रे, बिल
- आधार कार्डची झेरॉक्स
- बँक खात्याचा तपशील
फक्त शैक्षणिक खर्चासाठीच तरतूदप्रत्येक बालकाला फक्त एकावेळीच १० हजारांचा लाभ दिला जाईल. वय वर्षे १८ पर्यंत मुलगा-मुलगी खासगी शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असेल तर सन २०२२-२३ या चालू शैक्षणिक वर्षाची फी किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागत असेल किंवा खरेदी केले असेल तर त्याचे बिल या दोन कारणांसाठीच ही रक्कम दिली जाईल.
कोरोनाने अनाथ झालेल्या १८ वर्षे वयापर्यंतच्या बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी दहा हजारांपर्यंतची रक्कम दिली जात आहे. त्यातून या मुलांना शिक्षणासाठी चांगली मदत होऊ शकेल. - शिल्पा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी